विदर्भातील अद्ययावत अभिलेखागार यवतमाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 02:12 PM2019-05-18T14:12:12+5:302019-05-18T14:14:49+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे दस्तावेज जपून ठेवण्याचे काम अभिलेखागार विभागाने पार पाडले आहे. शेकडो वर्षांचा इतिहास सांगणारे दस्तावेज पुढील पिढीसाठीही सुरक्षित राहावे यासाठी कॉम्पॅक्टर प्रणालीचा अवलंब केला आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे दस्तावेज जपून ठेवण्याचे काम अभिलेखागार विभागाने पार पाडले आहे. शेकडो वर्षांचा इतिहास सांगणारे दस्तावेज पुढील पिढीसाठीही सुरक्षित राहावे यासाठी कॉम्पॅक्टर प्रणालीचा अवलंब केला आहे. याचा विदर्भातील पहिला प्रयोग यवतमाळात होत आहे. एक कोटी दस्तावेज यामुळे सुरक्षित होणार आहे. त्याकरिता जिल्हा विकास निधीमधील नाविन्यपूर्ण योजनेतून ७० लाख रूपये वळते करण्यात आले आहेत.
वंशावळ, जुने दाखले, वहीवाटी, नकाशे, गावाच्या नोंदी, नद्या, त्याकाळात घेण्यात आलेले निर्णय आणि बऱ्याच गोष्टींचे पुरावे सांगणारे दस्तावेज अभिलेखा विभागाने सुरक्षित ठेवले आहे. पूर्वी हे दस्तावेज गठ्ठ्यामध्ये बांधून ठेवले जात होते. यानंतर वर्षानुसार कोडवर्डमध्ये रंगाचा वापर करून दस्तावेज ठेवण्यात आले. वाळवी अथवा कुठलीही किड लागू नये म्हणून त्याला विशिष्ट फवारण्याही करण्यात येतात. अलीकडे या कागदांचे स्कॅनिंग करण्यात आले.
यानंतरही काही वस्तूंच्या मूळ प्रती अत्यावश्यक आहे. त्या आजही गठ्ठ्यांमध्ये बांधून ठेवल्या आहेत. त्यावर वर्षांचे लेबल लावून आहे. हा दस्तावेज शतकाचा इतिहास सांगतो. मात्र आग, वाळवी, झुरळ आणि उंदरापासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. यावर मात करण्यासाठी ‘कॉम्पॅक्टर फाईल स्टोअरेज सिस्टीम’चा वापर करण्यात येणार आहे. याकरिता लागणारे उपकरण थेट इंदोर आणि मुंबईतून आले आहेत. विशेष म्हणजे, कॉम्पॅक्टर फाईल स्टोअरेज सिस्टीम दस्तावेजांना आगीपासून सुरक्षा पुरविणार आहे. किमान तीन तास आगीतही हा विभाग सुरक्षित राहू शकतो.
विशेष म्हणजे, कमी जागेत हा दस्तावेज बसतो. त्याला दोन बाजूंनी उघडता येते. त्याकरिता पूर्ण पॅकबंद करणारे मोठे कपाट आहे. हे कपाट सिल करण्यासाठी कोडवर्ड पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. ते उघडण्याची विशिष्ट पद्धत आहे. विशेष म्हणजे, दस्तावेज पाहताना वर्षानुसार गठ्ठे उघडावे लागणार नाही. फाईल सहज पाहता येणार आहे. यामुळे हा प्रयोग महत्वपूर्ण मानला जात आहे.
आठ ठिकाणी अंमलबजावणी
प्रारंभी यवतमाळ जिल्हा मुख्यालय आणि सात उपविभागीय कार्यालयात या प्रयोगाची अंमलबजावणी होणार आहे. यानंतर जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे.
बळीराजा कक्षात उभारणी
कॉम्पॅक्टर प्रणाली ठेवण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या जुन्या कक्षाचा वापर करण्यात येणार आहे. ११ फूट उंचीपर्यंत याची उभारणी करण्यात येत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पोहचले आहे.
अभिलेखागाराला सुरक्षित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. यामुळे सर्व दृष्टीने अभिलेखा विभाग सुुरक्षित होणार आहे. लायब्ररीप्रमाणे प्रत्येक फाईल सहज उपलब्ध होणार आहे. यातून वेळ वाचेल. कमी जागेत दस्तावेज राहतील.
- अजय गुुल्हाने
जिल्हाधिकारी, यवतमाळ