विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवड

By admin | Published: October 30, 2014 10:59 PM2014-10-30T22:59:51+5:302014-10-30T22:59:51+5:30

विदर्भाचं पांढरं सोनं म्हणून ज्याची ओळख आहे त्या कापूस उत्पादक शेतकऱ्याची फेडरेशनच्या छुप्या अजेंड्यामुळे चांगलीच परवड सुरू आहे. महासंघाने यावर्षी अद्यापही कापूस खरेदीचा शुभारंभ केला नाही.

Vidarbha's white gold spell | विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवड

विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवड

Next

महागाव : विदर्भाचं पांढरं सोनं म्हणून ज्याची ओळख आहे त्या कापूस उत्पादक शेतकऱ्याची फेडरेशनच्या छुप्या अजेंड्यामुळे चांगलीच परवड सुरू आहे. महासंघाने यावर्षी अद्यापही कापूस खरेदीचा शुभारंभ केला नाही. खासगी व्यापाऱ्यांनी ही संधी साधून मनमानी भावात खरेदी सुरू केली आहे. महासंघाने तीन हजार ८०० रुपये भाव कापसाला देवू केला असून कापसाच्या प्रतवारीतून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे.
राज्यात राजकीय बदल होताच पणन महासंघावर भारतीय जनता पार्टीमधील काही नवीन चेहऱ्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुसद येथील विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे पराभूत उमेदवार व खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष, उमरखेडचे माजी आमदार व भाजपचे कट्टर कार्यकर्ते यांची नावे यामध्ये आघाडीवर आहेत. विदर्भाचं पांढरं सोनं म्हणून कापसाला दर्जा मिळाला आहे. त्या पांढऱ्या सोन्याची राज्यात व त्यातही विदर्भात चांगलीच परवड सुरू आहे. हक्काचे आणि प्रगतीचे पीक म्हणून कापसाचे उत्पादन विदर्भात सर्वाधिक घेतले जाते. कापसाच्या विविध जाती याच विदर्भातील शेतकऱ्यांनी रुजविल्या आहेत. बीटी कॉटन असो की अन्य बीटीच्या जाती, अनेक आव्हानात्मक कापसाची लागवड विदर्भातील शेतकऱ्यांनी करून कापसातील विविध उत्पादनाबाबत वेगवेगळे विक्रम केले आहेत. अंबोडा येथील प्रगतिशील शेतकरी अमृतराव देशमुख यांनी तर कपाशीच्या आगळ्यावेगळ्या लागवडी पद्धतीमधून घेतलेले उत्पादन राज्यातच नव्हे तर गुजरात सरकारमध्येसुद्धा कौतुकास पात्र ठरले आहे. अमृत पॅटर्न म्हणून त्यांच्या नावाने कपासीचे बियाणे देखील बाजारात आता उपलब्ध झाले आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग करून कापसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आधार वाटवा म्हणून राज्यात कापूस उत्पादक पणन महासंघाची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हक्काची बाजारपेठ आणि भाव देण्यामध्ये फेडरेशनचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून फेडरेशनची कापूस खरेदी म्हणजे वरातीमागून घोडे अशी अवस्था झाली आहे. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी हे वैदर्भीय सुपुत्र असून देखील त्यांच्या कार्यकाळात फेडरेशनला उतरतीच कळा लागल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. हजारो कर्मचाऱ्यांचा डोल्हारा आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेला पणन महासंघ अखेरच्या घटका मोजत असल्यागत दिसून येत आहे. फेडरेशनवर अवलंबून असलेल्या खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिनिंग सहकारी संस्था चांगल्याच डबघाईस आल्या आहेत.
डॉ. एन.पी. हिराणी हे कुशल प्रशासक असतानासुद्धा विदर्भाच्या कापसाला ते आवश्यक त्या उंचीवर अद्याप नेवू शकले नाही. गेल्या १२ वर्षांपासून फेडरेशनची निवडणूकच झाली नाही. आता मात्र राज्यात सत्तेची खांदेपालट झाली असून विदर्भात आणि त्यातही पुसदला न्याय द्यायचा झाल्यास नवीन व्यक्तीची चाचपणी सुरू झाली आहे. हा व्यक्ती भाजपाचा आणि त्यातही पुसद तालुक्यातीलच असावा असा प्रयत्न असल्यामुळे पुसदच्या तीन लोकांचे नाव यामध्ये आघाडीवर आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha's white gold spell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.