Video : वाहत गेलेल्या बसचा व्हिडिओ व्हायरल, मदतीसाठी युवकांच्या लगेचच पाण्यात उड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:19 AM2021-09-28T10:19:44+5:302021-09-28T10:22:12+5:30
सध्या बस पुलावरुन पुढे जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, बस पुलावरून हळूवारपणे पाण्यात जाताना दिसते. त्यानंतर, पुढे जाऊन बस पलटी झाल्याचेही दिसून येते.
यवतमाळ - हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी सायंकाळपासून मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने झोडपले आहे. येथील नद्या नाले, ओढे तुडुंब भरले असून शेकडो गावांची वाताहात झाल्याचं पाहायला मिळत आहे. गावागावात पाणी शिरले असून मदत व बचावकार्य सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड गावापासून 2 किमी अंतरावरील गावात पुलावरुन बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे.
उमरखेड ते पुसद मार्गावर दहागाव नाल्यावर नागपुर आगाराची बस क्र. ५०१८ वाहून गेली, त्यामध्ये वाहक आणि चालकासह 5 जण होते. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार आनंद देऊळगावककर व उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या, स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने मदत व बचावकार्य सुरू आहे.
यवतमाळ - उमरखेडजवळ वाहून गेली बस, युवकांनी घेतल्या पाण्यात उड्या pic.twitter.com/5EmVMeksh2
— Lokmat (@MiLOKMAT) September 28, 2021
सध्या बस पुलावरुन पुढे जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, बस पुलावरून हळूवारपणे पाण्यात जाताना दिसते. त्यानंतर, पुढे जाऊन बस पलटी झाल्याचेही दिसून येते. बस पलटी झाल्याचे दिसताच, पुलाजवळ उभारलेल्या तरुणांनी धावत जाऊन पाण्यात उड्या घेतल्या असून मदतीसाठी तात्काळ धाव घेतल्याचेही व्हिडिओत दिसून येते.
दरम्यान, बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली.