कोरोना संसर्गावर दक्ष जिल्हा प्रशासनाची मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:00 AM2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:22+5:30
यवतमाळ : महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव होताच सर्वात आधी संवेदनशील झालेल्या यवतमाळातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, ...
यवतमाळ : महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव होताच सर्वात आधी संवेदनशील झालेल्या यवतमाळातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, ही जरी वस्तुस्थिती असली, तरी जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे त्यातील सात जणांची प्रकृती पूर्ण ठणठणीत झाली, हेही दिलासादायक वास्तव आहे. रुग्ण आढळला की लगेच त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे, त्यांना क्वारंटाईन करणे, संबंधित परिसर सील करून आरोग्याचा सर्व्हे करणे ही कामे ज्या धडाडीने आणि धडाक्याने सुरू आहे, ते बघता, कोरोना रुग्णांच्या अहवालाचा प्रवास ‘पॉझिटिव्ह’कडून ‘निगेटिव्ह’कडे वाढत चालला आहे. विशेष म्हणजे, संचारबंदीत बाजारातील गर्दी नियंत्रित ठेवण्यातही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बाजी मारली आहे. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा परिषदेचे सीईओ जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, आशा सेविका, अंगणवाडीताई आदींनी केलेली कामगिरी वाखाणण्यासारखीच आहे. त्यातही ‘मेडिकल’चे डॉक्टर, नर्स यांच्या सेवाकार्याला तर सलामच!
कोरोना ‘कंट्रोल’ करतानाच महसूलचे खरीप हंगामासाठीही ‘प्लॅनिंग’
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रशासनाने शक्य त्या सर्व कठोर उपाययोजना यशस्वी केल्या. मात्र कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवत असतानाच जिल्हा प्रशासन, विशेषत: महसूल प्रशासनाने खरीप हंगामाचीही तयारी केल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात पाच कन्टेन्मेंट एरिया करण्यात आले आहे. त्यात यवतमाळातील जाफरनगर, मेमन कॉलनी, इंदिरानगर या तीन परिसरासह नेर हा चौथा तर सावर-बाभूळगाव हा पाचवा कन्टेन्मेंट एरिया आहे. तेथील ४६,१५२ लोकसंख्येचा १४३ पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे.
२० एप्रिलपासून काही क्षेत्रांना संचारबंदीतून मर्यादित सूट दिली जाणार आहे. उद्योगात येणाºया प्रत्येक कामगाराची रोज आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी तेथील एचआर विभागावर असेल. त्यासाठी त्यांना फिवर क्लिनिक सुरू करावे लागेल. संचारबंदीत सूट मिळालेल्या लोकांना एसडीओ, एसडीपीओ यांच्याकडून पास घ्यावी लागेल.
जिल्ह्यात २० शिवभोजन केंद्र सुरू असून रोज २२५० थाळ्यांचे टार्गेट ओलांडत आहे. याशिवाय ११५० रेशन दुकानात मोफत धान्याचा पुरवठा झाला असून दोन दिवसात उर्वरित ९०० दुकानांमध्ये पुरवठा होईल.
अॅन्टी कोरोना बुस्टर डायट
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आहारावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले. आता या रुग्णांना अॅन्टी कोरोना बुस्टर डायट दिला जाणार आहे. त्यात सकाळी ६.३० वाजता ग्रीन-टी, अंजीर, बदाम दिले जाईल. त्यानंतर त्यांना योगासनांचे धडे मिळतील. त्यानंतर सकाळची पोषक न्याहारी, दुपारचे जेवण, सायंकाळच्या जेवणापूर्वी व्हीटॅमिन-सी असलेली फळे आणि रात्री स्टॅमिना फुड दिले जाणार आहे. हा आहार मेडिकलच्या आहार तज्ज्ञांकडून पडताळल्यानंतर सुरू केला जाणार आहे. रुग्ण मूळचे कोणत्याही जिल्ह्यातील असले तरी त्यांची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे. मेडिकलच्या डॉक्टरांसाठी हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय करण्याचे निर्देश आरडीसींना दिल्याचेही जिल्हाधिकारी एम.डी. सिंह म्हणाले.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात कोरोना, सारीचे सर्वेक्षण सुरूच
रवींद्र चांदेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क असून मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात कोरोना आणि सारीचे सर्वेक्षण सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
जलज शर्मा म्हणाले, कोरोनामुळे जिल्ह्याची यंत्रणा सतर्क आहे. यात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि इतर सर्व विभागही आपले योगदान देत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाला फिवर क्लिनिकमध्ये रूपांतरित केले. बाहेरून आलेल्या आणि इतर नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदींबाबत माहिती घेतली जात आहे. दररोज संबंधित नागरिकांना आरोग्य कर्मचारी फोन करीत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू आहे.
‘मनरेगा’ची कामे ४ एप्रिलपासून
कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले आहे. मात्र ग्रामीण भागातील मजुरांना काम मिळावे म्हणून ४ एप्रिलपासून मनरेगाच्या कामांना सुुरुवात करण्यात आली. यात संपूर्ण राज्यात जिल्हा तिसºया क्रमांकावर असून सुमारे साडेपाच हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले. मनरेगाअंतर्गत सिंचन विहिरी, शोषखड्डे आदी कामे केली जात असून तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. ग्रामीण भागात शेतीकामांना बंधन नाही. आता पाझर तलाव दुरुस्ती तसेच धडक सिंचन विहिरी आणि शेततळे दुरुस्तीची कामे करण्यास परवानगी दिल्याचे शर्मा यांनी सांगितले. कोरोनामुळे प्रशासनातर्फे वारंवार हात धुण्यास सांगितले जाते. मात्र ग्रामीण भागात पाणी उपलब्ध आहे का, असे विचारले असता सीईओ जलज शर्मा यांनी बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा मुबलक असल्याचे सांगितले. जिल्ह्यात तूर्तास पुसद तालुक्यात केवळ दोन टँकर सुरू आहेत. नागरिकांनी वारंवार हात धुतल्यास कोरोनाचा संसर्ग होणार नाही. याशिवाय नागरिकांना नेहमीसाठी हात धुण्याची सवय लागल्यास इतर आजारही दूर होण्यास मदत मिळेल. यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. विशेष म्हणजे, शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधीपासून विविध उपाययोजना सुरू केल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
सुरक्षेची भावना निर्माण केल्याने पोलीस बंदोबस्त झाला यशस्वी
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना बंदोबस्ताला जाताना प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचारी जबाबदारीचे भान ठेवून कर्तव्य बजावत आहे. वरिष्ठ अधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यावर भर दिला. त्यांना लागणाºया साधन सुविधा उपलब्ध करून दिल्या, असे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले.
पोलिसांना आवश्यक ती सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली. वेलफेअर फंडातून मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड इतकेच नव्हेतर शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पीपीई किट दिल्या. होमगार्ड व पोलिसांना नाश्ता, जेवण पोलीस मेसमधून पुरविण्यात येत आहे. प्रतिबंधित भागात कर्तव्यावर असलेल्यांची न चुकता वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आशा वर्कर्सपासून सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची दिवसातून एकवेळा आरोग्य तपासणी केली जाते.
कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित असल्याचा विश्वास निर्माण केल्याने एक महिन्यापासून यशस्वी बंदोबस्त सुरू आहे. जनतेमध्येही पोलीस त्रास देण्यासाठी नाही तर तुमच्या सुरक्षिततेसाठी झटत आहे, हा संदेश पोहोचविण्याचे काम केले. विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना दंड आकारला. आता ३ मेपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने व जबाबदारीने जिल्हा पोलीस दल काम करेल, असा विश्वास आहे. या व्यतिरिक्त अवैध दारू विक्री, हातभट्टीची दारूच्या केसेसही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलिसांनी माणुसकीचे दर्शन देत अनेक गोरगरीब व अडचणीतील लोकांना मदत केली आहे. हा बंदोबस्त लावताना तांत्रिक साधनांची मदत घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांशी चांगला समन्वय असल्याने काम करताना कुठलीच अडचण येत नाही. पोलीस महासंचालक आठवड्यातून एकदा प्रत्यक्ष चर्चा करतात. अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्या अनुभवाचा फायदा होत असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले. पोलिसांच्या मार्चच्या पगाराची ५० टक्के रक्कम खात्यात जमा झाली आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम लवकरच येणार आहे. होमगार्डच्या मानधनासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याशी चर्चा करून आपत्ती व्यवस्थापन निधीमधून आर्थिक तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.