सामाजिक कार्यकर्त्यांमुळे शेतात पोहोचली ‘विकासगंगा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:39 PM2018-10-21T23:39:46+5:302018-10-21T23:41:34+5:30
सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीवेने काम केल्यास सर्वसामान्यांच्या जगण्यात परिवर्तन घडण्यास वेळ लागत नाही. घाटंजी येथील सामाजिक संस्थेने हीच जबाबदारी पार पाडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात ‘विकासगंगा’ आणली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीवेने काम केल्यास सर्वसामान्यांच्या जगण्यात परिवर्तन घडण्यास वेळ लागत नाही. घाटंजी येथील सामाजिक संस्थेने हीच जबाबदारी पार पाडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात ‘विकासगंगा’ आणली आहे. एकीकडे जलसमृद्धी आणि दुसरीकडे गाळ टाकून शेतीसमृद्धी साधण्यात आली आहे.
घाटंजी येथील विकासगंगा संस्थेच्या माध्यमातून ही कामगिरी पार पडली. नेर तालुक्यातील शिंगाडोह प्रकल्पाचा उन्हाळ्यात उपसा करण्यात आला. त्यातील गाळ शेतकºयांना मोफत पुरविण्यात आला. उत्तरवाढोना येथील शेतकरी प्रितम राठोड यांनी या गाळाचा उत्तम वापर केला. या शेतकºयाकडे सहा एकर शेती असून चार एकरमध्ये धरणातील गाळ टाकला. पाऊस लवकर आल्याने दोन एकरमध्ये गाळ टाकणे शक्य झाले नाही. या शेतात सहा एकरमध्ये सोयाबीनचे पीक घेतले. गाळ टाकलेल्या जागेत एकरी साडेसात क्विंटल व गाळ न टाकलेल्या जागेत एकरी साडेचार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले.
त्याचवेळी विकासगंगा संस्थेतर्फे घाटंजी तालुक्यातील घोटी लघुप्रकल्पाचाही उपसा करण्यात आला. तेथील गाळ शेतकºयांना देण्यात आला. घोटी येथील शेतकरी जितेंद्र खडतरे यांच्याकडे दोन एकर शेती असून त्यांनी दोन एकरमध्ये धरणातील गाळ टाकला आहे. या शेतात एक एकरमध्ये कापूस व एक एकरमध्ये पाषाणभेद या औषधी वनस्पतीचे पीक घेतले. पिकास कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत वापरलेले नाही. रसायनमुक्त शेती केली. तसेच फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्काचा वापर केला. त्यामुळे शेतीवरील खर्चात बचत झाली असून पीकही जोमदार आहे. गाळ टाकलेल्या जागेत एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. गाळामुळे भुसभुशीत झालेल्या जागेत पाषाणभेद या कंदवर्गीय औषधी वनस्पतीची उत्तम वाढ झाल्याने एकरी सात क्विंटल वाळलेल्या मुळांचे उत्पादन मिळणार आहे. पाषाणभेद लावलेल्या शेतात गाळ टाकलेल्या व गाळ न टाकलेल्या जागेवरील पिकाच्या वाढीमध्ये फरक दिसून येत आहे.