गटातटाच्या राजकारणात विकासाला ग्रहण; ढाणकीत नगर पंचायत होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 02:43 PM2022-02-02T14:43:19+5:302022-02-02T14:54:41+5:30

ढाणकीचा विकास राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे खुंटल्याची ओरड आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

village development bethold due to internal politics in dhanki nagar panchayat | गटातटाच्या राजकारणात विकासाला ग्रहण; ढाणकीत नगर पंचायत होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’च

गटातटाच्या राजकारणात विकासाला ग्रहण; ढाणकीत नगर पंचायत होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’च

Next

यवतमाळ : खेड्याचे शहर झाले की, प्रत्येकालाच गावाचा विकास होईल, असे वाटते. मात्र, ही बाब प्रत्येक गावाला लागू होईल, असे नाही. येथेही तसेच झाले. ढाणकीत नगर पंचायत स्थापन होऊनही केवळ गटातटाच्या राजकारणामुळे विकासाला ग्रहण लागले आहे.

ढाणकी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर होऊन आता दोन वर्षांचा कालावधी लोटला. तरीही गावाची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. गावात कोणताही नवीन उपक्रम राबविण्यात आलेला नाही. केवळ नगर पंचायत कर्मचारी कर वसुलीसाठी येतात, तेव्हाच पावतीवर बघून आपण ढाणकी शहरात आहोत, असे शहरवासीयांना वाटते. शहराचा विकास राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे खुंटल्याची ओरड आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

नगर पंचायतीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळलेले नाही. त्यामुळे आपली सत्ता नगर पंचायतीमध्ये यावी म्हणून प्रत्येक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. मंगळवारी झालेल्या विषय समिती सभापतींच्या निवडणुकीत हेच चित्र दिसून आले. या निवडीतून भाजपने सपशेल माघार घेतल्याने केवळ दोनच समित्या गठित होऊ शकल्या. महाविकास आघाडीनेसुद्धा ताठर भूमिका घेतल्याने शहरामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहराला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. मात्र, राजकारणी केवळ सत्तेसाठी झगडत असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरात एकही सार्वजनिक शौचालय नाही. नगर पंचायत होऊन दोन वर्षे झाली तरी कोणत्याही नगरसेवकाने याकडे लक्ष दिलेले नाही. स्वच्छ भारत मोहीम सुरू असताना प्रभाग क्रमांक १४ मध्ये महिलांची आजही उघडी ‘गोदरी’ आहे. तेथे नगर पंचायतीच्यावतीने सार्वजनिक शौचालय बांधणे अत्यंत गरजेचे असताना नगर पंचायत त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत आहे.

महिलांना जावे लागते उघड्यावर

शहरात शौचालयांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक प्रभागांतील महिलांना उघड्यावरच प्रात:विधीसाठी जावे लागत आहे. नगरसेवक सभागृहात या प्रश्नांवर का बोलत नाहीत, हाच मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. सत्ता केवळ कमाईचे साधन झाले असून, नागरिकांचे प्रश्न आहेत तसेच कायम आहेत. विकासाला कोणी वाली मिळणार की, गटातटाच्या राजकारणात पाच वर्षे निघून जाणार, असा प्रश्न आहे. मात्र, पक्षीय राजकारणात सामान्य नागरिकांचा बळी जात आहे, हे मात्र खरे.

Web Title: village development bethold due to internal politics in dhanki nagar panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.