ग्रामवासीयांनी काढले ६० तास अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:43 AM2021-09-11T04:43:21+5:302021-09-11T04:43:21+5:30
दिग्रस : तालुक्यातील तुपटाकळी येथे तब्बल ६० तास वीज गुल होती. त्यामुळे ग्रामस्थांना दोन रात्री अंधारात काढाव्या लागल्या. संतापलेल्या ...
दिग्रस : तालुक्यातील तुपटाकळी येथे तब्बल ६० तास वीज गुल होती. त्यामुळे ग्रामस्थांना दोन रात्री अंधारात काढाव्या लागल्या. संतापलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी येथील वीज वितरण कंपनी कार्यालयावर धडक देउन रोष व्यक्त केला.
गेले तीन दिवस व दोन रात्री गावातील अर्ध्या भागातील पुरवठा खंडित होता. दिवसभर वीज कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा केल्यानंतर शनिवारी ग्रामस्थांनी थेट पोलिसांत धाव घेतली. ठाणेदार सोनाजी आमले यांना निवेदन देऊन रोष व्यक्त केला. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका तुपटाकळी ग्रामवासीयांना बसत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. एका खांबावरील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आहे. तो बदलवून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची गावकऱ्यांनी कित्येकदा महावितरणकडे मागणी केली. मात्र, तीन महिने होऊनही ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आला नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी गावकऱ्यांनी संपर्क केला असता उद्या काम करून देतो, असे आश्वासन दिले. मात्र, वीजपुरवठा सुरू झाला नाही. अखेर कंटाळलेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठून सोनाजी आमले यांना आपबिती सांगितली.
बॉक्स
अनुचित प्रकार घडल्यास महावितरण जबाबदार
गावकऱ्यांनी ठाणेदारांना निवेदन देऊन विजेअभावी गावात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास महावितरण कंपनी व त्यांचे अभियंता जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे. निवेदन देताना लक्ष्मण टेकाळे, अल्ताफ पठाण, शंकर भस्मे, निसार पठाण, चंदन जाधव, हरून धारिवाला, जयसिंग चव्हाण, भारत शेलकर, गोपाल क्षीरसागर, पुंडलिक एलधरे व नागरिक उपस्थित होते.