'त्या' गावातील २०० घरांना टाळे, नेमकं कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 01:21 PM2022-02-11T13:21:00+5:302022-02-11T13:30:28+5:30

साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे.

villages become empty as labour with families left village and went towards city for employment | 'त्या' गावातील २०० घरांना टाळे, नेमकं कारण काय?

'त्या' गावातील २०० घरांना टाळे, नेमकं कारण काय?

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक गावे पडली ओसरोहयो योजना कुचकामी, कामाच्या शोधात शहराकडे धाव

प्रकाश सातघरे

दिग्रस (यवतमाळ) : दुष्काळी परिस्थिती, शेतातील संपलेली कामे आणि रोजगार हमीच्या कामाबाबत उदासीनता, यामुळे तालुक्यातील शेकडो मजूर कामाच्या शोधात शहरांकडे धाव घेत आहे. यातूनच विठाळा येथील चक्क २०० घरांना टाळे लागले आहे.

साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे. विठाळा येथे सहज फेरफटका मारला तरी दोन घराआड एका घराला टाळे लागलेले दिसून येते. तेथील ७० टक्के कुटुंब मजुरीवरच गुजराण करतात. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने मजुरांच्या हाताला कामच नाही. सुगीच्या हंगामात शेतकऱ्यांसोबत मजूरही रिकाम्या हाताने दिसत आहे. या परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न मजुरांना पडला.

टीचभर पोटाची वितभर खळगी भरण्यासाठी तेथील अनेक कुटुंब आता मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सुरत आदी शहरांचा रस्ता धरत आहे. गत दोन महिन्यात या गावातून तब्बल १००० च्यावर मजूर रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाले आहे. मुंबई, पुण्यात ही मंडळी बांधकाम, हॉटेल, रंगाई, विटभट्टी आदी कामे करून संसाराचा गाडा हाकत आहे. काही मंडळी शहरानजीकच्या परिसरात विटभट्टीवर काम करताना दिसून येत आहे. विठाळासह तालुक्यातील काही गावांतील अनेक जण सुरत, पुणे येथील कंपनीत कामाला गेले आहे. परिणामी गावातील घरांना टाळे लागलेले दिसून येते. यामुळे उदास झालेले अंगण आणि घराला दिसणारे टाळे पाहून गावाची रौनकच हरविली आहे.

गावातच काम उपलब्ध करून देण्याची गरज

मजुरांचे स्थलांतरण रोखण्यासाठी रोजगार हमीची कामे शासनाच्यावतीने केली जातात. विठाळा येथे पांदण रस्ता, विहिरी आणि शौचालयाचे बांधकाम रोहयोमधून प्रस्तावित आहे. परंतु मोठ्या प्रमाणात काम नसल्याने ही मंडळी शहराकडे धाव घेत आहे. आपल्या मुलाबाळांसह शहरात वास्तव्याला जात आहे. त्यांना गावातच काम उपलब्ध करून दिल्यास त्यांचे स्थलांतरण थांबू शकते. परंतु कुणीही पुढाकार घेत नाही. अशीच अवस्था तालुक्यातील इतरही गावांची आहे.

तालुक्यातुन स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. गावात काम मिळत नसल्याने ही मंडळी बाहेरगावी जातात. परिस्थिती अशीच राहिल्यास विठाळा गाव निर्मनुष्य होण्याची भीती आहे.

शारदा राजेश राठोड, सरपंच, विठाळा.

Web Title: villages become empty as labour with families left village and went towards city for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.