‘आदर्श’साठी निवडलेल्या गावांना समस्यांनी वेढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 09:59 PM2018-08-22T21:59:10+5:302018-08-22T21:59:49+5:30
आदर्श गावांसाठी निवडल्या गेलेल्या तालुक्यातील तीनही गावांना विविध समस्यांनी वेढले आहे. मुख्यमंत्रीदूतांनी तयार केलेले विकास आराखडे कागदावरच राहात आहे. परिणामी या गावांच्या ‘आदर्श’ला ब्रेक लागत आहे.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : आदर्श गावांसाठी निवडल्या गेलेल्या तालुक्यातील तीनही गावांना विविध समस्यांनी वेढले आहे. मुख्यमंत्रीदूतांनी तयार केलेले विकास आराखडे कागदावरच राहात आहे. परिणामी या गावांच्या ‘आदर्श’ला ब्रेक लागत आहे.
महाराष्टÑातील एक हजार ग्रामपंचायतींची मुख्यमंत्र्यांनी आदर्श गावासाठी निवड केली आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील २३ गावे आहे. नेर तालुक्यातील इंद्रठाणा, चिकणी, पाथ्रड या तीन गावांचा यामध्ये समावेश आहे. ही गावे आदर्श करण्यासाठी मुख्यमंत्री दूत नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी तयार केलेले विकास आराखडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्षित आहे. त्यामुळे या तीनही गावांचा विकास तर दूर, समस्यांनीच अधिक वेढले आहे. या गावांमध्ये नाल्या, रस्ते नाही. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आहे. पाथ्रड गोळे हे गाव मुख्यमंत्र्यांनीच नव्हे तर तंटामुक्त व आदर्श ग्राम अंतर्गत विकासाकरीता निवडले गेले. प्रत्यक्ष या गावाची स्थिती पाहता ‘आदर्श’च्या प्रवाहात ते आलेच कसे हा प्रश्न पडतो.
इंद्रठाणा येथे रस्ते, पाणी या मुलभूत समस्या मोठ्या प्रमाणात आहे. चिकणी (डो) या गावाला राजकीय पंढरी म्हटले जाते. या गावातील दोघे जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यांच्या विकास कामांचे अस्तित्व याठिकाणी कुठेही दिसत नाही. या गावातील ५० टक्के लोक उघड्यावर शौचालयास जातात. सांडपाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी नागरिकांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या स्थितीत ही गावे ‘आदर्र्श’ कशी होईल हा प्रश्न आहे.
मुख्यमंत्रिदूत नामधारी
आदर्श गावासाठी निवडले गेलेले मुख्यमंत्रिदूत नामधारी ठरत आहे. त्यांना विशेष असा कुठलाही अधिकार नाही. निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो. त्यांनी मांडलेल्या अडचणीही तालुका किंवा जिल्हा प्रशासनाकडून सोडविल्या जात नाही.