विश्वाला ‘मोहन-वीणा’ देणारे विश्वमोहन भट्ट यांची यवतमाळात मैफल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 04:28 AM2019-11-15T04:28:39+5:302019-11-15T04:37:00+5:30

जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

VishMohan Bhatt's concert in the yavatmal | विश्वाला ‘मोहन-वीणा’ देणारे विश्वमोहन भट्ट यांची यवतमाळात मैफल

विश्वाला ‘मोहन-वीणा’ देणारे विश्वमोहन भट्ट यांची यवतमाळात मैफल

Next

यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिकस्तरावर वेगळी ओळख मिळवून देणारे पद्मश्री, पद्मभूषण पंडित विश्वमोहन भट्ट आणि राजस्थानी गायकांची जुगलबंदी रंगणार आहे. ही संगीत मैफल रविवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील प्रेरणास्थळावर आयोजित करण्यात आली आहे. बाबूजींच्या स्मृती समारोहानिमित्त दरवर्षी यवतमाळच्या रसिकांना दर्जेदार सांगितिक मेजवानी मिळते. यंदा होणाऱ्या ‘स्वरांजली’ कार्यक्रमात पद्मश्री, पद्मभूषण तथा ग्रॅमी अवार्ड विजेते पंडित विश्वमोहन भट्ट हे रसिकांना रिझविणार आहे.
राजस्थानी गायकांचीही रंगणार जुगलबंदी
पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या शास्त्रीय संगीतासोबतच नामवंत राजस्थानी गायकांचीही जुगलबंदी रंगणार आहे. शास्त्रीय संगीतासोबत राजस्थानी लोकगीतांचा ‘डेझर्ट स्टॉर्म विथ मंगणियार्स आॅफ राजस्थान’ हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सात्विक वीणा वादक पंडित सलील भट्ट असतील. तर पंडित उस्ताद अनवर खान मंगणियार हे राजस्थानी लोकगीत, सुफी रचना गाणार आहे. तसेच तबला वादक हिमांशू महंत, खडकताल वादक कुटले खान, ढोलक वादक गोरम खान, रमेश प्रजापती (साऊंड इंजिनिअर) हा ख्यातनाम कलासंच यावेळी रसिकांना आगळीवेगळी संगीत मेजवानी देणार आहे.
>पद्मश्री, पद्मभूषणसह देशविदेशात सन्मान
पंडित विश्वमोहन भट्ट यांना २००२ मध्ये पद्मश्री, त्याचवेळी ग्रॅमी अवॉर्डही मिळाला. २०१२ मध्ये राजस्थानरत्न, तर २०१७ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण प्रदान केला. विविध पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.
>२४ नोव्हेंबरला ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ वितरण
बाबूजींच्या स्मृती समारोहाचे औचित्य साधून रविवार, २४ नोव्हेंबर रोजी बीकेटी टायर्स प्रस्तुत ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे वितरण केले जाणार आहे. हा सोहळा सकाळी ११ वाजता यवतमाळातील दर्डा मातोश्री सभागृहात होणार आहे.
>२५ नोव्हेंबरला संगीतमय प्रार्थना सभा
सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत प्रेरणास्थळावर संगीतमय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात यवतमाळातील प्रथितयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना संगीतमय आदरांजली अर्पण करतील.

Web Title: VishMohan Bhatt's concert in the yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.