शरद पवारांची शेतात भेट अन् शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: September 23, 2015 05:56 AM2015-09-23T05:56:24+5:302015-09-23T05:56:24+5:30

ओल्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची झालेली अवस्था पाहण्यासाठी सप्टेंबर २०१३ मध्ये

Visit to Sharad Pawar's Field and Farmer's Suicide | शरद पवारांची शेतात भेट अन् शेतकऱ्याची आत्महत्या

शरद पवारांची शेतात भेट अन् शेतकऱ्याची आत्महत्या

Next

गजानन अक्कलवार ल्ल कळंब
ओल्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची झालेली अवस्था पाहण्यासाठी सप्टेंबर २०१३ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कळंब तालुक्यातील किन्हाळ्यात आले होते. त्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन त्याच्याशी चर्चा केली. मात्र या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने त्यांची ही भेट वांझोटी ठरली होती. कारण त्यांच्या भेटीनंतर १४ दिवसात या शेतकऱ्याने कोणतीही मदत न मिळाल्याने आपली जीवनयात्रा याच शेतात विष प्राशन करून संपविली होती. आता शरद पवार पुन्हा सप्टेंबर महिन्यातच दौऱ्यावर आले आहेत आणि ते आता कृषिमंत्रीही राहिले नाहीत. त्यामुळे त्यांचा हा दौरा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरोखरच किती उपयोगी ठरतो, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
थावरा सरदार राठोड (५०) रा. किन्हाळा या शेतकऱ्याने २९ सप्टेंबर २०१३ रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येची आठवण शरद पवारांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा ताजी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांचे यवतमाळात आगमन झाले. बुधवारी सकाळी ९.३० पासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. ते पिंपरीबुटी, भांबराजा व बोथबोडन येथील शेतकरी कुटुंबांना भेटी देणार आहेत. हा दौरा शेतकऱ्यांच्या दृष्टीने किती फलदायी ठरतो हे वेळच सांगणार असले तरी त्यांच्या यापूर्वीच्या पाहणी दौऱ्यातील आठवणी अन्य शेतकऱ्यांचा रक्तदाब वाढविण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.
सन २०१३ मध्ये जिल्ह्यात ओला दुष्काळ पडला होता. केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते. पिकांची अवस्था व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी पवार १५ सप्टेंबर २०१३ ला जिल्ह्यात आले होते. त्यांनी यवतमाळ-पांढरकवडा रोडवरील किन्हाळा गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी थावरा राठोड याच्या शेतातील पिकांची अवस्था आपल्या डोळ्याने टिपली होती. पीक हातचे गेले, लवकरच तुला मदत मिळेल, धीर सोडू नकोस असा आधार त्यांनी या शेतकऱ्याला दिला होता. त्याने त्यानंतर मदतीची प्रतीक्षा केली. अखेर या प्रतीक्षेतच २९ सप्टेंबर २०१३ ला त्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. थावराच्या नावे कोणतीही शेती नसल्याने त्याची आत्महत्या शासनाच्या दप्तरी बेदखल ठरली. आजतागायत त्याच्या कुटुंबीयांना एक रुपयाचीही मदत मिळू शकली नाही.
थावरा राठोड हा मक्ता-बटाईने शेती करीत होता. पत्नी सुनंदा व मुले छगन, विनोद हे सर्वच जण शेतात राबत होते. सन २०१३ ला त्याने कोळसा खाणीत नोकरीला असलेल्या आपल्या मेव्हण्याची सहा एकर शेती २५ हजार रुपये मक्त्याने केली होती. परंतु त्याच्या शेतातून पूर गेला आणि शेती उद्ध्वस्त झाली. त्यातच मदत न मिळाल्याने खचलेल्या थावराने आत्महत्या केली. त्यानंतर २०१४ ला त्याच्या पत्नी व मुलाने हिंमत न हारता तीच शेती कसली. परंतु त्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे काहीच पिकले नाही. उलट तोटा आला. तेव्हापासून त्यांनी शेती करणेच बंद केले. सुनंदा व छगन आता दुसऱ्याच्या शेतात रोजमजुरीला जातात. तर विनोद हा रोजगाराच्या शोधात पुण्याला गेला आहे. विशेष असे थावरा राठोडच्या मेव्हण्याची शेती तेव्हापासून पडिक आहे.

शरद पवारांच्या बुधवारपासून सुरु होणाऱ्या पिंपरी (बुटी), भांबराजा व बोथबोडन गावातील दौऱ्याच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. केंद्रीय कृषिमंत्री असताना पवारांना शेतकरी वाचविता आला नाही, तर आता केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना खरोखरच शेतकरी वाचविता येईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे. शरद पवारांचा सन २०१३ पाठोपाठ आता २०१५ चा शेती पाहणी दौराही वांझोटा ठरतो का याकडे नजरा लागल्या आहेत.

Web Title: Visit to Sharad Pawar's Field and Farmer's Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.