बोरीअरब येथे आजपासून विठ्ठल नामजप रौप्य महोत्सव
By admin | Published: March 13, 2016 02:54 AM2016-03-13T02:54:07+5:302016-03-13T02:54:07+5:30
तालुक्यातील बोरीअरब येथे विठ्ठल नामजप रौप्य महोत्सव कार्यक्रमाला रविवार १३ मार्चपासून प्रारंभ होत असून या महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे.
वारकऱ्यांचा मेळा : सामाजिक व आध्यात्मिक प्रबोधन
दारव्हा : तालुक्यातील बोरीअरब येथे विठ्ठल नामजप रौप्य महोत्सव कार्यक्रमाला रविवार १३ मार्चपासून प्रारंभ होत असून या महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. सामाजिक आणि आध्यात्मिक प्रबोधनाची मेजवाणी नागरिकांना मिळणार असून या सप्ताहाला राज्यभरातील २५ हजारांवर वारकरी उपस्थित राहणार आहे.
बोरीअरब येथे गत २५ वर्षांपासून दर रविवारी विठ्ठल नामजप केला जातो. या जप अनुष्ठानाला यंदा २५ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १३ मार्च रोजी या कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून २० मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवासाठी बोरीअरब येथील शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या प्रांगणात ३२ हजार चौरस फुटाचा सभा मंडप उभारण्यात आला आहे.
सुमारे २५ हजार भाविक दररोज उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. दररोज पाच हजार भाविकांची भोजन व्यवस्था आणि दोन हजार भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या महोत्सवात विविध क्षेत्रातील नामवंत सांस्कृतिक, कृषी, आरोग्य, व्यसनमुक्ती आणि सामाजिक विषयावर मार्गदर्शन करणार आहे. त्यात मधुकर महाराज खोडे, अपर्णाताई रामतीर्थकर, पोपटराव पवार, संदीप अपार, सिंधूताई सपकाळ, डॉ. तात्याराव लहाणे, जयंत चावरे यांचा समावेश असून दररोज रात्री महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिकीर्तन करणार आहेत.
सात दिवस बोरीअरब येथे वारकऱ्यांचा मेळा जमणार असून या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)