वणीतील आरोग्य यंत्रणा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:36 PM2018-03-10T23:36:26+5:302018-03-10T23:36:26+5:30
सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने शासकीय आरोग्य सेवेचे जाळे तयार केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा व त्यांच्या अनास्थेमुळे शासकीय आरोग्यसेवा कुचकामी ठरत आहे.
ऑनलाईन लोकमत
वणी : सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने शासकीय आरोग्य सेवेचे जाळे तयार केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा व त्यांच्या अनास्थेमुळे शासकीय आरोग्यसेवा कुचकामी ठरत आहे. परिणामी गोरगरिब जनतेलाही खासगी दवाखान्याची वाट धरून उपचार करून घ्यावे लागत असल्याने गोरगरिबांचे आर्थिक बजेट ढासळत आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी शहरात ग्रामीण रूग्णालय, तर ग्रामीण भागात कायर, शिरपूर, राजूर व कोलगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये बाह्यरूग्ण तपासणी, आंतर रूग्णसेवा, आरोग्य शिबिरे, लसीकरण व आरोग्यविषयक जनजागृती करणे, या बाबीकडे लक्ष देणे बंधनकारक आहे. मात्र आरोग्य केंद्रात असणारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा देण्याची अनास्था, यामुळे गोरगरिब जनतेला आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त होत आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही अवस्था याहून वेगळी नाही. शिरपूर आरोग्य केंद्रात नुकतेच नसबंदी शस्त्रक्रियेचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात काही गोरगरिब महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या. मात्र त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. स्वच्छ पाण्याची सोयसुद्धा करण्यात आली नव्हती. पंचायत समिती सदस्या वर्षा पोतराजे यांनी केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली असता, आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार त्यांना दिसून आला. तेव्हा त्यांनी तातडीने काही व्यवस्था करून देण्यास भाग पाडले. कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तर केवळ शोभेचीच वस्तू ठरत आहे. या केंद्रातील काही कर्मचारी सतत नशेत असल्याने तेथे महिला कर्मचाऱ्यांचीही सुरक्षितता राहिली नाही. शिरपूर व कोलगाव येथे वैद्यकीय अधिकारी तर रूग्णांना दिसणे भाग्याचे समजले जाते. बरेचदा केंद्रातील आरोग्य कर्मचारीच बाह्य रूग्ण तपासणी करताना आढळून येते.
राजूर येथे मोठ्या प्रमाणात कामगार आहे. त्यामुळे राजूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र उपयुक्त ठरणारे समजले जाते. मात्र या केंद्रातही रूग्णांना समाधानकारक सेवा मिळत नाही. कायरचे आरोग्य केंद्रातही कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने तेथील आरोग्य सेवा ढेपाळली आहे. आरोग्य उपकेंद्रात, तर आरोग्य कर्मचारी कधीच हजर राहत नसल्याने ही केंद्रे मोकाटच अवस्थेत आहे. या सर्व आरोग्य केंद्रावर नियंत्रण ठेवणारे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय तरी कशावर लक्ष ठेवतात, हे समजण्यास मार्ग नाही.
ग्रामीण रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघर
वणीचे ग्रामीण रूग्णालय तर समस्यांचे माहेरघरच बनले आहे. बाह्यरूग्णावर थातुरमातूर उपचार करणे, रूग्णांना रेफर करून वाट दाखविणे, या मार्गाचा अवलंब केला जात आहे. स्वच्छतेचा अभाव, सुरक्षेचा अभाव, यामुळे रूग्णांना उपचारासाठी जावे की नाही, हा विचार येतो. येथे काही विशेष तज्ज्ञांच्या कंत्राटी करारावर नियुक्त्या केल्या आहे. मात्र त्यांच्या सेवेचा रूग्णांना कधीच लाभ मिळत नाही. त्यांच्या वेतनावर दरमहा लाखोचा खर्च होत आहे.