पालकांची विवेकानंद विद्यालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:11 AM2017-12-01T01:11:19+5:302017-12-01T01:11:36+5:30
खासगी शिक्षण संस्थेने दहाव्या वर्गाच्या शिक्षकाची ऐन सत्राच्या मध्येच बदली केल्याने संतप्त पालकांनी गुरुवारी येथील विवेकानंद विद्यालयात धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खासगी शिक्षण संस्थेने दहाव्या वर्गाच्या शिक्षकाची ऐन सत्राच्या मध्येच बदली केल्याने संतप्त पालकांनी गुरुवारी येथील विवेकानंद विद्यालयात धडक दिली. बदली रद्द न केल्यास सोमवारपासून शाळाच उघडू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे दोन तास शाळेच्या आवारात तणावाचे चित्र होते.
येथील विवेकानंद विद्यालयात दहाव्या वर्गाला इंग्रजी शिकविणारे शिक्षक विवेक अलोणे यांची बदली करण्यात आली. ही माहिती कळताच दहाव्या वर्गाचे विद्यार्थी विचलित झाले. त्यांनी पालकांना माहिती दिल्यावर त्यांनाही धक्का बसला. दोन-तीन महिन्यातच दहावीची परीक्षा असताना शिक्षकाची बदली केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी गुरुवारी १२ वाजताच्या सुमारास शाळेत धडक दिली. पालकांचा रुद्रावतार पाहून शाळेने दहाव्या वर्गाला सुट्टी दिली. सुट्टी का दिली, याचे कारणच न समजल्याने विद्यार्थी शाळेच्या आवारातच घुटमळत राहिले. त्यामुळे पालकांची गर्दी, त्यातच विद्यार्थ्यांचा गोंगाट असे चित्र निर्माण झाले.
या प्रकरणात संस्था राजकारण करीत असल्याचा आरोपही पालकांनी केला. पालक शिक्षकाची बदली रद्द करण्याची मागणी करीत असतानाच संबंधित शिक्षकाला बदलीचा आदेशही देण्यात आला. त्यामुळे पालकांचा संताप वाढला. मुख्याध्यापकांची भेट घेतली असता, घोडखिंडी येथील शिक्षकाचा अपघात झाल्यामुळे त्या शाळेला शिक्षकाची गरज आहे. त्यामुळे अलोणे यांची तेथे बदली करण्यात आली, असे मुख्याध्यापक मोहन केळापुरे यांनी सांगितले. परंतु, घोडखिंडीला ज्या पद्धतीने गरज आहे, तशीच गरज इथल्या विद्यार्थ्यांना नाही का, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. सत्र संपल्यानंतर शिक्षकांची बदली केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
शैक्षणिक सत्राच्या मध्येच शिक्षकांच्या बदल्या झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, म्हणून राज्य शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पुढे लोटली आहे. मात्र विवेकानंद विद्यालय दहावीच्या शिक्षकाची बदली अचानक का करीत आहे, असा प्रश्न पालकांनी केला. याबाबत संस्थाचालकांशीही पालकांनी संपर्क केला. त्यावर शनिवारी सर्वजण एकत्र बसून निर्णय घेण्याचे आश्वासन पालकांना देण्यात आले. परंतु, शनिवारपर्यंत शिक्षकाचा बदली आदेश रद्द न केल्यास सोमवारपासून शाळाच उघडू देणार नाही, तसेच जिल्हाधिकाºयांना भेटून दाद मागण्यात येईल, असा इशारा दीपक केणे, कौस्तुभ मोहदरकर, अतुल खंडेश्वर, सोनल करोडदेव, मेघा चव्हाण, किरण राठोड, मिना ढोले, मनिषा हिरोळकर, संगीता गिरी, कांता मेश्राम, उषा वाघाडे, विनोद सवाई आदी पालकांनी दिला.