वेकोलित स्थानिकांना प्राधान्याने रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:59 PM2018-02-05T23:59:34+5:302018-02-05T23:59:56+5:30
वणी वेकोलि परिसरातील कोळसा खाण कंपन्या आणि कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : वणी वेकोलि परिसरातील कोळसा खाण कंपन्या आणि कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले.
येथील विश्रामगृहात कोळसा खाण कंपनी व मालवाहतूकदार संघटनांचे संचालक, प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासह वणीचे तहसीलदार, वेकोलिचे अधिकारी, परिवहन अधिकारी आदी उपस्थित होते.
वणी वेकोली क्षेत्रातील उकणी, जुनाद, निलजई, मुंगोली आदी गावात काम करणाºया कंपन्यांमध्ये स्थानिक बेजरोजगारांना डावलून परप्रांतीय मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार दिला जात असल्याच्या या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. तसेच एडीओबी, आरपीएलओबी, रंजीत ओबी आदी कंपन्यांद्वारे या भागात मालवाहू वाहनांवरही परप्रांतीय वाहनचालकांची भरती केली जाते, अशा तक्रारी होत्या. परिसरातील अनेक गावात शेतकºयांच्या जमिनीचे भूसंपादन करूनही त्यांना मोबदला दिलेला नाही, तसेच रोजगारही दिला नाही. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या तक्रारी सोडविण्याची मागणी माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केली होती. त्याअनुषंगाने ना. संजय राठोड यांनी वेकोलि अधिकारी व प्रशासकीय अधिकाºयांची ही बैठक घेतली. वेकाली क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी येत्या एक महिन्यात स्थानिक बेरोजगारांना नियमाप्रमाणे रोजगार देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. राठोड यांनी दिले.
या परिसरातून माती व कोळशाची वाहतूक करताना सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांची दुरावस्था होत असल्याने ही वाहतूक गावाबाहेरून वळविण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना ना.राठोड यांनी दिल्या. भूसंपादन होऊनही अद्याप मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना रोजगार देताना प्राधान्य देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
बैठकीला गैरहजर कामगार अधिकारी, वणी व शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही ना. राठोड यांनी यावेळी प्रशासनाला दिले.