दिग्रसचा स्वर बनला महाराष्ट्राचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:28 AM2018-01-09T00:28:15+5:302018-01-09T00:28:49+5:30

सारेगामापा स्पर्धेत माझा महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक आला. पण या विजयापेक्षाही स्पर्धेदरम्यान परीक्षक बेलातार्इंनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी संस्मरणीय ठरणार आहे.

The Voice of Maharashtra became the voice of Digras | दिग्रसचा स्वर बनला महाराष्ट्राचा आवाज

दिग्रसचा स्वर बनला महाराष्ट्राचा आवाज

Next
ठळक मुद्देउज्ज्वल गजभार बेलातार्इंची शाबासकी स्पर्धेच्या बक्षिसापेक्षाही मोठी, शास्त्रीय संगीताचा ‘बेस’ हवाच

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : सारेगामापा स्पर्धेत माझा महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक आला. पण या विजयापेक्षाही स्पर्धेदरम्यान परीक्षक बेलातार्इंनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी संस्मरणीय ठरणार आहे. माझ्या रूपाने मराठी सिनेसृष्टीला नवा गायक मिळाला, हे त्यांचे शब्द माझ्या पुढच्या प्रयत्नांना बळ देणार आहे... टीव्ही वाहिनीवरील सारेगामापा स्पर्धेत चमकलेला हिरा ‘लोकमत’शी बोलत होता. उज्ज्वल गजभार हे या दमदार गायकाचे नाव.
टीव्हीवरच्या चकाचक कार्यक्रमात आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या खेड्यातला पोरगा चमकला. महाराष्ट्रभरातून आलेल्या एकापेक्षा एक सरस गायकांना मागे टाकत तो महागायक ठरला. उज्ज्वल मोतीरामजी गजभार हे त्याचे नाव. दिग्रसजवळच्या देऊरवाडा या पुनवर्सित गावातला त्याचा जन्म. अशा छोट्याशा खेड्यातल्या उज्ज्वलच्या सुरांनी महाराष्ट्राला मोहीत कसे केले? वाचा त्याच्याच शब्दात... ‘मी वयाच्या तिसºया वर्षीच गायन सुरू केले. लहान असताना कोणतीही वस्तू घ्यायची अन् वाजवायची, हाच माझा उद्योग होता. साधा ओरडलो तरी त्यात इतरांना सूर असल्याचे जाणवायचे. त्यातूनच माझ्या आईवडीलांनी माझ्यातला ‘गायक’ ओळखला असावा आणि त्यांनी मला संगीताचे शिक्षण द्यायला सुरूवात केली..’
वडील मोतीरामजी चांगले गातात. त्यांनीच उज्ज्वलला गायनाचे प्राथमिक धडे दिले. नंतर घाटंजी येथील पं. विजय दुरुतकर आणि दीपक निळे यांच्याकडे उज्ज्वलने शास्त्रीय संगीताचा रितसर रियाज केला. दिग्रसच्या विद्यानिकेतनमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले, दिनबाई विद्यालयात आठवी ते दहावी आणि बुटले महाविद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेतल्यावर उज्ज्वल सध्या पुण्याच्या भारती विद्यापीठात संगीत विषयात बीए करतोय. रविवारी सारेगामापा स्पर्धेत महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावल्यावर ‘लोकमत’शी बोलताना तो म्हणाला, दुरुतकर गुरुजींसोबत यवतमाळात भरपूर कार्यक्रम केले. पण गुरुजी गेले तेव्हापासून मी गावाकडे गेलोच नाही. पुणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या शहरांतही कार्यक्रम केले. पण जाहीर कार्यक्रमातला परफॉर्मन्स आणि टीव्हीवरच्या स्पर्धेतला परफार्मन्स यात जमीन आसमानाचे अंतर आहे. तिथे हजार-दोन हजार श्रोते असतात. पण ही स्पर्धा राज्यातील हजारो प्रेक्षक बघत असतात. शिवाय, आपला प्रत्येक सुरावर तज्ज्ञांची बारीक नजर असते. म्हणूनच या स्पर्धेतून बरेच काही शिकताही आले.
यवतमाळ असो की विदर्भ, खेड्यातल्या पोरांमध्येही टॅलेंट आहेच. पण खंत एवढीच की, विदर्भात शास्त्रीय संगीत फारसे ऐकायला मिळत नाही. आपले लोक गझल, कव्वाली, भजन एवढ्यावरच रमतात. पण गायन क्षेत्रात पुढे जायचे असेल तर शास्त्रीय संगीताचा ‘बेस’ हवाच. मी महागायक ठरू शकलो नाही, माझा दुसरा क्रमांक आला. त्याचे कारण, माझ्या गायनात फक्त मराठमोळी झलक दिसते. घराण्याच्या तालमीचे अंग त्यात दिसत नाही. मला जाणवलेली ही कमतरताही मी पॉझिटिव्हली घेतलीय. पुढे तसा सराव करेल. सारेगामा स्पर्धेतील आवडते गीत कोणते असे विचारल्यावर उज्ज्वल म्हणाला...
अंधार दाटला बेभानल्या दिशा
चकव्यात उभी, अंगार उरी विझलेला
ही साद की तुझा आभास साजना
गंधाळून येई देह पुन्हा मिटलेला
विझल्या विझल्या राखेत नवा
वणवा कुठला उमजेना...

Web Title: The Voice of Maharashtra became the voice of Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.