Video - जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारा यवतमाळमध्ये मतदार जनजागृती रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 01:20 PM2019-03-03T13:20:16+5:302019-03-03T14:09:35+5:30
जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित विविध संस्थांच्या पुढाकारात यवतमाळ येथे रविवारी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
यवतमाळ - जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित विविध संस्थांच्या पुढाकारात यवतमाळ येथे रविवारी (3 मार्च) मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. युवक आणि नागरिकांमध्ये मतदार आणि मतदानाविषयी या माध्यमातून जागृती करण्यात आली.
येथील आझाद मैदानात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव व लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार आदींच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मार्गदर्शन केले. मतदानाचे महत्त्व पटवून देतानाच युवांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन केले. प्रश्नोत्तराच्या रुपात त्यांनी उपस्थितांमध्ये मतदार नोंदणी आणि मतदानाविषयी जनजागृती केली. प्रत्येक भारतीयाने मतदानाचा हक्क बजावला तरच लोकशाही मजबूत होणार आहे हीच भावना जनमनात जागृत करण्यासाठी जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी), हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि यवतमाळ पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली.
‘रन फॉर नेशन, रन फॉर व्होट’ ही जनजागृती रॅली काढली गेली. महात्मा फुले चौक, नेताजी चौक, दत्त चौक, श्रोत्री हॉस्पिटल, स्वस्तीक चौक, तहसील चौक, गांधी चौक, चर्च रोड, स्टेट बँक चौक, पोस्ट ऑफीस चौक, हनुमान आखाडा चौक, इंदिरा गांधी मार्केट आदी भागातून मार्गक्रमण करीत आझाद मैदानात या जनजागृती रॅलीचा समारोप झाला.