विधान परिषदेसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:18+5:30
प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने परिषदेची यवतमाळातील ही जागा रिक्त झाली. त्यासाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने नागपुरातील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना रिंगणात उतरविले आहे. तर भाजपने सुमित बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत असून शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी त्याकरिता मतदान घेतले जाणार आहे.
प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने परिषदेची यवतमाळातील ही जागा रिक्त झाली. त्यासाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने नागपुरातील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना रिंगणात उतरविले आहे. तर भाजपने सुमित बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. चार अपक्षांनीही या रिंगणात उडी घेतली होती. परंतु त्यांना हा उत्साह अखेरपर्यंत टिकविता आला नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत पहायला मिळणार आहे.
जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपरिषदा, नगर पंचायतींचे सदस्य आणि १६ पंचायत समित्यांचे सभापती असे मिळून एकूण ४८९ मतदार या मतदारसंघात आहे. उपविभागीय मुख्यालय असलेल्या सात ठिकाणी मतदान केंद्रे राहणार आहेत. शुक्रवारी सकाळपासून या मतदानाला सुरुवात होईल. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
विधान परिषदेच्या रिंगणातील या दोन्ही उमेदवारांच्या नेत्यांनी आपल्याकडे तीनशे पेक्षा अधिक मतदार असल्याचा दावा केला आहे. यापैकी कुणाचा दावा खरा ठरतो हे ४ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशा तीन पक्षांचे मतदार सांभाळताना महाविकास आघाडीचे नेते वनमंत्री संजय राठोड यांची कसरत होताना पहायला मिळत आहे. भाजपची कमांड माजी राज्यमंत्री तथा यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्या हाती आहे. भाजपच्या उमेदवाराने आपल्या पक्षाचे व समर्थक मतदारांना एकसंघ ठेवण्यासोबतच अन्य पक्षातील काठावरच्या व अस्थिर मतदारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले. त्यात बऱ्यापैकी त्यांना यश आल्याचेही सांगितले जाते.
दोन्ही प्रमुख उमेदवारांनी आपले मतदार दुसºयाच्या गळ्याला लागू नये म्हणून खास खबरदारी घेतली आहे. त्यासाठी बहुतांश मतदारांना राज्याबाहेर देवदर्शन व पर्यटनाला पाठविण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी हे मतदार यवतमाळात परतणार आहेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ‘घोडेबाजार’ झाला आहे. अर्थकारणातून दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. क्रॉस व्होटींग सिद्ध करणे कठीण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने दोन्ही बाजूकडून पक्षाच्या अधिकृत मतदारांना क्रॉस व्होटींगसाठी जोर दिला जात आहे.
अवैध मतदान, क्रॉस व्होटींग टाळण्याचे आव्हान
विधान परिषदेच्या या निवडणुकीत अवैध ठरणारे मतदान आणि क्रॉस व्होटींग टाळण्याचे आव्हान दोन्ही उमेदवारांपुढे प्रकर्षाने राहणार आहे. त्यातही महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने त्यांच्यापुढील हे आव्हान आणखी गडद आहे. अवैध मतांचा फटका उमेदवारांंना बसण्याची शक्यता आहे.