वडगाव रोड ठाणेदाराची नियंत्रण कक्षात बदली
By admin | Published: April 21, 2017 02:14 AM2017-04-21T02:14:10+5:302017-04-21T02:14:10+5:30
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या पथकाने येथील शारदा चौकात पोलीस चौकीनजीकच्या
धाडीनंतर कारवाई : ट्राफिक पीआयकडे प्रभार
यवतमाळ : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या पथकाने येथील शारदा चौकात पोलीस चौकीनजीकच्या जुगार अड्ड्यावर धाड यशस्वी केली. या प्रकरणी संबंधित वडगाव रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार देविदास ढोले यांची बुधवारी रात्री नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली.
मंगळवारी महानिरीक्षकांच्या पथकाने राजरोसपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड घातली. तेथून आठ जणांना अटक करुन ३८ हजार रुपये जप्त केले. यातील दोघे अद्याप फरार आहे. या धाडीने वडगाव रोड पोलीस, एसडीपीओंचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. या धाडीमुळे कुणाकुणावर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार, याची चर्चा पोलीस दलात सुरू असतानाच पहिली कुऱ्हाड वडगाव रोडचे ठाणेदार देविदास ढोलेंवर कोसळली. त्यांची उचलबांगडी करून नियंत्रण कक्षात बसविण्यात आले. विशेष असे ढोले हे २० एप्रिलपासून रजेवर जाणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांची बदली केली गेली. वडगाव रोड ठाणेदार पदाची अतिरिक्त जबाबदारी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ढोले यांच्या चौकशीचे आदेश महानिरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यात शारदा चौकातील जुगाराबाबत वडगाव रोडची कुंडली काढली जाणार आहे. ढोलेंवरील कारवाई बदलीवर थांबते की, आणखी पुढे जाते, याकडे पोलीस यंत्रणेच्या नजरा आहे. महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना निलंबन कारवाईचे संकेत दिले होते, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)
धाडीमागे ‘अर्थ’कारण लपल्याची चर्चा
शारदा चौकातील याच जुगार अड्ड्यावर तत्कालीन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी धाड घातली होती. त्यावेळी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. यावेळी थेट महानिरीक्षकांच्या पथकाने धाड घातल्याने कारवाई होणार म्हणून संबंधित बीटचे अधिकारी-कर्मचारी धास्तावले होते. मात्र लहान कर्मचाऱ्यांना दोषी न धरता थेट वरिष्ठावर कारवाई झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जुगारावरील या धाडीमागे ‘अर्थ’कारण लपले असल्याची चर्चाही पोलीस वर्तुळातून ऐकायला मिळते आहे.