वाघापूरला पुराची भीती
By admin | Published: August 13, 2016 01:29 AM2016-08-13T01:29:11+5:302016-08-13T01:29:11+5:30
शहरालगतच्या वाघापूर क्षेत्रात नाल्याच्या पुराचे पाणी अनेकवेळा नागरिकांच्या घरात घुसले आहे.
पालिकेचे चुकीचे धोरण : रविदास सोसायटीत पुन्हा पाणी
यवतमाळ : शहरालगतच्या वाघापूर क्षेत्रात नाल्याच्या पुराचे पाणी अनेकवेळा नागरिकांच्या घरात घुसले आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याचे विभाजन केल्यास वसाहतीत पाणी शिरण्याचा धोका कमी होऊ शकतो यवतमाळ नगर परिषद मात्र अनेक सोसायटीच्या पावसाचे पाणी संत रविदास या एकाच सोसायटीच्या नालीत सोडण्याचा प्रयत्न करीत असल्याने या भागात पुन्हा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाघापूर भागातील संत रविदास सोसायटी भागातून याआधी नाला वाहत होता. कालांतराने हा नाला संपुष्टात आला आहे. तरीही या भागातून पुराच्या पाण्याचा प्रवाह इतर भागाच्या तुलनेत अधिक असतो वाघापूर ग्रामपंचायतने काही प्रमाणात पुराच्या पाण्याचे विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याने आता नागरीकांच्या घरात पाणी घुसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पंधरा ते विस वर्ष पुराच्या पाण्याच्या त्रासापासून नागरीकांची सुटका झाली असतांनाच नगर परीषदेचे अधिकारी मात्र पुन्हा संत रविदास सोसायटीमधील नागरीकांना पुराच्या पाण्यात लोटण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या अंजनेय सोसायटी ते सिंघानिया लेआऊट या भागात मोकळया मैदानात मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. हे पाणी लगतच्या सावित्रीबाई फुले सोसायटी मधील नालीमधून वाहून जाऊ शकते मात्र या परीसरातील नागरीकांनी घरासमोरील नाल्या बुजवून टाकल्या आहेत. त्यामुळे साचलेल्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. आता यावर तोडगा काढण्यासाठी नगर परीषदेच्या प्रशासकीय यंत्रणेने संबंधीत भागातील बुजविण्यात आलेल्या नाल्या मोकळया करणे गरजेचे असताना येथील पाणी संत रविदास सोसायटी मधील नालीत सोडण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेष म्हणजे सिमेंटचा रस्ता फोडून पाईप टाकून जमा पाणी रविदास सोसायटीत सोडल्या जाणार आहे. या ठिकाणी सिमेंटचे पाईप येऊन पडताच या भागातील नागरीकांचा संताप अनावर झाला आहे. आजच्या स्थितीत अनेक भागातील पाणी संत रविदास सोसायटी मधील नालीतूनच वाहते. वर्षभर वाहणारी अशी येथील नाली आहे. अशा अवस्थेत नगर परीषद मात्र सिंघानिया नगर चे पाणी सरळ उतारात न सोडता रविदास सोसायटीत सोडण्याचा प्रयत्न करीत आहे. असे झाल्यास संततधार पावसात पावसाच्या पाण्याचा फ्लो वाढल्यास नाल्याला पूर येऊन या भागातील घरात पाणी घुसल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक भागातील नाली शेवटपर्यंत मोकळी करणे तसेच पाण्याचे विभाजन करणे गरजेचे आहे असे असताना जाणिवपूर्वक एकाच नालीवर पाण्याचा ताण निर्माण करण्याचा हा प्रयत्न अन्याय करणारा असल्याचे निवेदन माणिकराव शेळके, भास्कर भागवते तसेच इतर नागरीकांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिले आहे. (प्रतिनिधी)
नागरिकांमध्ये रोष
काही वर्षापूर्वीच ग्रामपंचायतच्या प्रयत्नामुळे या भागातील नाल्याला येणारा पूर बंद झाला असताना आता नगरपरिषदेच्या उरफाट्या कारभारामुळे पुन्हा एकदा संत रविदास सोसायटीतील नाल्याला पूर येवून पाणी घरात शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.