वाघापूर ग्रामपंचायतीचा कारभार ढेपाळला
By admin | Published: July 12, 2014 01:49 AM2014-07-12T01:49:48+5:302014-07-12T01:49:48+5:30
शहरालगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. येथील एकही विकास काम पूर्ण झाले नाही...
यवतमाळ : शहरालगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. येथील एकही विकास काम पूर्ण झाले नाही. नागरिकांना मूलभूत सुविधाही पुरविण्यात ग्रामपंचायत अयशस्वी ठरत असल्याचे दिसून येते. ग्रामसेवक व कर्मचारीच उपस्थित राहत नसल्याने येथे कोणावरच नियंत्रण नाही.
वाघापूर ग्रामपंचायतीला अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. शहरालगत असलेला हा परिसर दुर्लक्षित असल्याचे दिसून येते. या ग्रामपंचायतीमध्ये नव्याने उदयास आलेल्या आठवलेनगर, प्रियंकानगर, विलास नगर, वाघाईनगरी येथील लेआऊटमध्ये कोणत्याच सुविधा पुरविण्यात आल्या नाही. रस्ते, नाल्या नसल्याने पावसाळ्यात वाहने घरापासून दूर ठेवून चिखल तुडवित जावे लागते. ग्रामपंचायतीचे याकडे लक्ष नाही.
ग्रामपंचायत कार्यालयात सहा लिपीकवर्गीय कर्मचारी आहेत. मात्र कार्यालयीन वेळेतही यापैकी एकही जण उपस्थित राहत नाही. ग्रामसेवकाला तर कार्यालयाची अॅलर्जी असल्याचेच दिसते. तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकूण घेण्यासाठीही कुणीच राहत नाही. घंटागाडीवर कचरा गोळा करण्यासाठी नेमलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. प्रचंड अनागोंदी असल्यामुळेच गेली पाच वर्षात ग्रामसभेने घेतलेल्या एकाही ठरावाची प्रत्यक्षात अंमलबजावणीच झाली नाही. घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीला वित्त आयोगातून १५ लाख रुपये मिळाले. प्रत्यक्षात मात्र घनकचरा व्यवस्थापनाची कुठलीच सुविधा ग्रामपंचायतीजवळ नाही. हा निधी खर्च न झाल्यामुळे परत गेला आहे. गावात सर्वत्र घाण साचल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. हागणदारी मुक्तीसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी दोन लाख रुपये मिळाले.
दोन वर्षांपासून या शौचालयाचे काम रखडलेले आहे. मिळालेल्या निधीपैकी किती रक्कम खर्च झाली, याचा हिशेबही देण्यास कुणीच तयार नाही. गावाच्या सौंदर्यीकरणासाठी आलेले १५ लाख रुपयेही अखर्चित आहेत. हा पैसा सुद्धा घनकचऱ्याच्या निधीप्रमाणे परत जाण्याची शक्यता आहे.
पावसाळा सुरू झाला तरी प्रत्यक्ष उपाययोजना मात्र करण्यात आलेली नाही. नाल्या तुंबलेल्या असल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते. याबाबत दरवर्षीच तक्रारी होतात. पाऊस आल्यानंतर अनेकांची तारांबळ होते. परंतु खबरदारी म्हणून कुठलीही उपाययोजना ग्रामपंचायतीकडून केली जात नाही.
घन कचऱ्यासाठी विशिष्ट जागा निश्चित केली नसल्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरातच कचरा टाकला जात आहे. अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आल्यानंंतर तेथे उभे राहण्याची सोय राहिली नाही. स्मशानभूमीलाच कचरा डेपोचे स्वरुप आले आहे.
ग्रामपंचायतीने ५० हजार रुपये खर्च करून रोपवाटिका तयार केली होती. प्रत्यक्षात कुठलेही काम या रोपवाटिकेचे झाले नाही. हा निधी कागदोपत्रीच रोपवाटिका दाखवून हडपल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. एकंदरच वाघापूर ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णत: ढेपाळला असून यासाठी दोषी ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)