आता प्रतीक्षा मृगाची
By admin | Published: June 11, 2014 12:21 AM2014-06-11T00:21:21+5:302014-06-11T00:21:21+5:30
गतवर्षी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले होते. रबी हंगाम गारपिटीने झोडपला होता. यंदा मात्र सारं काही सुरळीत होईल, या अपेक्षेसह खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर रोहिणी नक्षत्र कोरडे
पुसद : गतवर्षी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले होते. रबी हंगाम गारपिटीने झोडपला होता. यंदा मात्र सारं काही सुरळीत होईल, या अपेक्षेसह खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने संकट उभे ठाकले आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा मृगधारेकडे लागल्या आहेत. मृग नक्षत्र प्रारंभ होवून तीन दिवस होवूनही पाऊस न बरसल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
२५ मेपासून रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला. उष्णता कमी होऊन नभ ढगांनी दाटून येत होते. पाऊस येईल, असे चित्र असताना सर्वांच्याच अपेक्षेवर पाणी पडले. आता पुन्हा सूर्य आग ओकू लागला आहे. पुसदचा पारा ४६ अंशावर गेला आहे. पाऊस आणि शेतीचे फार जवळचे नाते असले तरी मानवी व्यवहारांचा संपूर्ण अर्थशास्त्र नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. मृगाचे वाहन हत्ती आहे. त्यामुळे पावसाळ्याची सुरुवात दमदार होईल, अशी आशा जाणकारांची आहे.
गतवर्षी रोहिणी नक्षत्रापासूनच पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतरच्या सर्वच नक्षत्रांना समाधानकारक पाऊस पडला होता. यंदा रोहिणी नक्षत्र कोरडे गेले असले तरी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे वृत्त धडकताच शेतकऱ्यांनी जमिनी पेरणीसाठी तयार ठेवल्या आहेत. एकदाचा मृगाचा दमदार पाऊस पडला म्हणून पेरणीची वाट मोकळी होईल. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटात सापडल्याने शेती व्यवस्था तोट्यात येत आहे. शिवाय पाण्याचा प्रश्नही बिकट आहे.
शेतात पीक जोमावर असताना कुठले ना कुठले नैसर्गिक संकट येतेच. आता मान्सून लवकरच येणार असल्यामुळे शेतकरी बी-बियाणे आणि खतांची जुळवाजुळव करीत आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी कपाशीचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत असला तरी सोयाबीनचे पीक घेण्यामागचा ओढा मात्र कमी झालेला दिसत नाही. यंदा कपाशीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक घेण्याचा निर्धार केला आहे. एकंदरित खरीप हंगामातील पेरण्यांकडे शेतकरी पेरणीपूर्व मशागती आटोपून सज्ज झाला आहे.
यंदा बियाण्यांच्या किमती सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहे. कर्ज काढून अनेकांनी बियाण्यांची खरेदी केली आहे. बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मृगाच्या धारांची प्रतीक्षा आहे.
(तालुका प्रतिनिधी)