रेती घाटांना लिलावाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:42 PM2018-10-17T23:42:56+5:302018-10-17T23:43:59+5:30
यंदा चांगल्या पावसामुळे नदी-नाल्यांना किमान दोन चांगले पूर आले. परिणामी नदी-नाल्यांमध्ये उतकृष्ट प्रतिची रेती वाहून आली. मात्र या घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने सध्या वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात तस्करांचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : यंदा चांगल्या पावसामुळे नदी-नाल्यांना किमान दोन चांगले पूर आले. परिणामी नदी-नाल्यांमध्ये उतकृष्ट प्रतिची रेती वाहून आली. मात्र या घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने सध्या वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात तस्करांचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे त्याचा महसूल विभागाला चांगलाच फटका बसत आहे.
विशेष म्हणजे रेती घाट तस्करांकडून कुरतडले जात असले तरी कारवाया मात्र समाधानकारक नसल्याने कारवाई करणारी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली. महसूल विभागातील कर्मचाºयांना हाताशी धरून हे तस्कर रात्रीच्या अंधारात शेकडो ब्रास रेती बिनबोभाटपणे पळवित आहे. यासंदर्भात महसूल विभागाला जाणिव असली तरी संबंधित कर्मचारी तस्करांच्या दावणीला बांधून असल्याने तस्करांचे आता फावत आहे. वणी तालुक्यात विदर्भा, निर्गुडा, वर्धा, झरी तालुक्यात पैनगंगा व पांढरकवडा तालुक्यात खूनी नदी आहे.
यासोबतच वणी व पांढरकवडा उपविभागात नाल्यांचेही प्रमाण मोठे आहे. त्यातून गेल्या काही महिन्यांपासून रेतीची मोठ्या प्रमाणावर चोरी केली जात आहे. एखाद्याने तक्रार केल्यास संबंधित घाटावर जाऊन महसूल कर्मचाºयांकडून केवळ चौकशीचा फार्स केल्या जातो. मात्र प्रत्यक्षात कारवाई केली जात नसल्याचा अनुभव अनेकदा आला.
असा प्रकार घोन्सा परिसरात घडला असल्याचे सांगितले जाते. घोन्सा परिसरातील विदर्भा नदी वाहते. यंदा या नदीला अनेकदा मोठा पूर आला. त्यामुळे या नदीमध्ये उत्कृष्ट प्रतीची रेती वाहून आली आहे. नेमकी ही बाब हेरून तस्करांनी या नदीतील अनेक घाटांवर डल्ला मारला. मात्र महसूल विभागाचे कर्मचारी वरिष्ठांना अंधारात ठेऊन प्रकरण जागीच ‘सेटल’ करीत असल्याची माहिती जाणकाराने दिली.
उमरघाटच्या नाल्याचा ‘घाट’ तस्करांच्या घशात
मारेगाव व वणी तालुक्याच्या सीमेवर परंतु मारेगाव तालुक्याच्या हद्दीत येणाºया उमरघाट येथील नाल्यात यंदा मोठ्या प्रमाणावर रेती वाहून आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तस्करांनी नाल्याचा हा घाट कुरतडणे सुरू केले. यासंदर्भात महसूल विभागाकडे तोंडी तक्रारीही झाल्या. परंतु कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसले नाही. घोन्सा परिसरातील एका तस्कराचे महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाºयांशी असलेल्या मधूर संबंधातूनच संबंधित तस्कराने रेती चोरून नेण्यात ‘विजय’ मिळविल्याची चर्चा आहे.