पुलाला वर्षभरापासून दुरूस्तीची प्रतीक्षा
By Admin | Published: August 9, 2014 11:58 PM2014-08-09T23:58:45+5:302014-08-09T23:58:45+5:30
तालुक्यातील घोन्सा येथील विदर्भा नदीवरील पूल गेल्या वर्षभरापासून अद्याप दुरूस्तीच्या प्रतीक्षेतच आहे़ गेल्यावर्षी अतिवृष्टीमध्ये विदर्भा नदीवरील पुलाची एक बाजू पूर्णत:
वणी : तालुक्यातील घोन्सा येथील विदर्भा नदीवरील पूल गेल्या वर्षभरापासून अद्याप दुरूस्तीच्या प्रतीक्षेतच आहे़
गेल्यावर्षी अतिवृष्टीमध्ये विदर्भा नदीवरील पुलाची एक बाजू पूर्णत: खचली होती़ त्यामुळे दोन-तीन महिने या पुलावरून वाहतुकही ठप्प पडली होती. घोन्सा गावात बसही जात नव्हती़ त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना दहेगाव किंवा कुंभारखणीला जाऊन बसची प्रतीक्षा करावी लागत होती़ याबाबत ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगावला निवेदनही दिले होते़ मात्र पुलाची अजूनही दुरूस्ती झालीच नाही़
घोन्सा येथील काही विटभट्टी चालकांनी मागीलवर्षी पूल खचला त्या ठिकाणी मुरूम व जेसीबीने जंगलातील मोठमोठे दगड टाकून लोकवर्गणीतून हा मार्ग जाण्या योग्य केला होता. परंतु एका वर्षाचा कालावधी लोटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची दुरूस्ती न केल्याने ग्रामस्थ व वाहन चालकांमध्ये प्रशासनाविरूध्द रोष खदखदत आहे़ घोन्सा परिसरातील ग्रामस्थांना या मार्गावरूनच वणी व झरीला ये-जा करावी लागते़ आता पावसाळ्याचे दिवस आहे़ विदर्भा नदीला जर पुन्हा पूर आला, तर उर्वरित पुलही खचण्याची शक्यता बळावली आहे.
या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यताही बळावली आहे. सध्या या पुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्यावरील डांबर पूर्णत: उखडले आहे. रात्री-अपरात्री या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना हा खड्डा दिसत नाही. त्यामुळे वाहन थेट खड्ड्यात जात आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पुलाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी वाहन चालक व ग्रामस्थांची मागणी आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)