कला-वाणिज्य’त झुंबड, विज्ञान शाखेला प्रतीक्षा
By admin | Published: July 5, 2014 01:34 AM2014-07-05T01:34:54+5:302014-07-05T01:34:54+5:30
अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली असून कला आणि वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी झुंबड होत आहे.
यवतमाळ : अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली असून कला आणि वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी झुंबड होत आहे. त्या तुलनेत विज्ञान शाखेच्या अनेक ठिकाणी जागा रिक्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३.५५ टक्के लागला होता. यात ग्रामीण भागातील मुले मोठ्या संख्येने उत्तीर्ण झाली. शहरी भागात गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली. परिणामी अकरावी प्रवेशासाठी ग्रामीण भागातील मुलांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. स्पर्धा परीक्षेमुळे ग्रामीण भागातील मुलांचा कल कला शाखेकडे आहे. बरेच विद्यार्थी केवळ पदवी घेवून स्पर्धा परीक्षेला बसण्याची तयारी करत आहे. त्यामुळे कला शाखेच्या प्रवेशासाठी गर्दी झाली.
अशीच स्थिती वाणिज्य शाखेची आहे. पूर्वी वाणिज्य शाखेला विशेष महत्व होते. मध्यंतरीच्या काळात याकडे पाठ फिरविली. आता मात्र पुणे, मुबंई या महारनगराचा ट्रेंड येत असल्याने वाणिज्य शाखेच्या प्रवेशाचा ओघ वाढत आहे. वाणिज्यची पदवी असली की, जॉब हमखास मिळतो. आतातर विस्तारलेल्या बँकिंग क्षेत्रामुळे येथे रोजगाराला भरपूर वाव आहे. हेच ओळखून पालक मुलांचा वाणिज्य शाखेत प्रवेश घेत आहे, असे दाते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भीमराव ठोंबरे यांनी सांगितले. नावलौकिक असलेल्या महाविद्यालयात कला आणि वाणिज्य शाखेच्या पहिल्याच यादी प्रवेश क्षमता पूर्ण झाली आहे. या ऊलट स्थिती विज्ञान शाखेची आहे. या शाखेकडे शहरी विद्यार्थ्यांचा कल आहे. क्वचितच ग्रामीण विद्यार्थी या शाखेला प्रवेश घेऊ इच्छितात. त्यामुळे येथे अजूनही भरपूर जागा रिक्त आहेत. पहिल्या फेरीनंतरही विज्ञान शाखा प्रवेशासाठी फारसी स्पर्धा दिसून येत नाही. यवतमाळ शहरासह बहुतांश महाविद्यालयात पहिल्या फेरीतच अकरावीच्या कला आणि वाणिज्य शाखा हाऊसफुल्ल झाल्या आहेत, असे अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा यांनी सांगितले.
ही स्थिती हाताळण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ११ ते १३ जुलैदरम्यान प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याला तीन महाविद्यालयाचे पर्याय दिले जाणार आहेत. अजुनही काही माहाविद्यालयांनी प्रवेशाची अंतीम म्हणजे तिसरी यादी प्रसिध्द केली नाही. ही प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षणाधिकारी कार्यालय सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी अर्ज स्वीकारणार आहे. बरेचदा एकच विद्यार्थी प्रवेशासाठी चार ते पाच महाविद्यालयात अर्ज टाकतो. त्यामुळे आज जरी जागा भरलेल्या दिसत असल्या तरी निश्चित रिक्त होणार आहे. शिवाय जागा वाढवू देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. २० जुलै पूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)