काँग्रेसच्या यादीची प्रतीक्षा कायम; राजू तोडसाम यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 05:33 PM2024-10-26T17:33:50+5:302024-10-26T17:34:36+5:30

वंचितचे दोन उमेदवार जाहीर : मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Waiting for Congress list continues; Raju Todsam joined BJP | काँग्रेसच्या यादीची प्रतीक्षा कायम; राजू तोडसाम यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

Waiting for Congress list continues; Raju Todsam joined BJP

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे बाळासाहेब मांगुळकर यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त असले तरी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेसकडून याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. अनेकांना काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवार यादीची प्रतीक्षा होती. दरम्यान, आर्णी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजू तोडसाम यांनी भाजपमध्ये पुनश्च प्रवेश केल्याने तोडसाम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असल्याने आता उमेदवारी भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.


यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. महायुतीतील भाजपने यवतमाळ, राळेगाव आणि वणी मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच पुसद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे इंद्रनील नाईक आणि दिग्रस मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने वणी मतदारसंघातून उद्धवसेनेच्या वतीने संजय देरकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागली आहे, ती काँग्रेस उमेदवारांच्या यादीची. 


यवतमाळ मतदारसंघातून बाळासाहेब मांगुळकर यांचे नाव निश्चित झाल्याबाबतचे मेसेज शुक्रवारी रात्री फिरत होते. मात्र, पक्षातर्फे अधिकृत घोषणा झालेली नव्हती. शुक्रवारी रात्री उशिरा अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने इतर मतदारसंघातही कोणाला उमेदवारी मिळते याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ही यादी आल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. 


जिल्ह्यात नऊ उमेदवारांनी दाखल केले नामांकन 

  • यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आता नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेवटचे चार दिवस उरले आहेत. शुक्रवारी ९ उमेद- वारांनी नामांकन अर्ज दाखल केले. आतापर्यंत सात विधानसभांत १६ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. आर्णी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडून जितेंद्र शिवाजीराव मोघे यांनी अर्ज दाखल केला. तसेच अपक्ष नामदेव सोयाम, उमरखेड विधानसभा मतदारसं- घातून संध्या संदेश रणवीर, सदाशिव रामा वाठोरे यांनी नामांकन दाखल केले.
  • यवतमाळ विधानसभेत गुरुवारी तीन नामांकन अर्ज आले. यामध्ये स्नेहल विद्या-अरुण रेचे, मनोज महादेव गेडाम, दिलीप वामनराव बेलसरे यांचा समावेश आहे. तर वणी मतदारसंघात मनसेकडून राजू उंबरकर, पुसद विधानसभेतून मधुकर राठोड यांनी नामांकन दाखल केले आहे.
  • शुक्रवारी जिल्ह्यात ५७ इच्छुकांनी १०६ अर्जाची उचल केली आहे. शुक्रवारी दिवसभर महाविकास आघाडीतील काँग्रेसची दुसरी यादी कधी प्रसिद्ध होते, याचीच चर्चा होती. 


वाघमारे यांची उमेदवारी जाहीर 
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी रात्री उशिरा ४५ उमेदवारांची सहावी यादी जाहीर झाली. यामध्ये जिल्ह्यातील दोन मतदारसं घांतील उमेदवारांचा समावेश आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. नीरज ओमप्रकाश वाघमारे तर दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी नाजूकराव धांदे यांची उमेदवारी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली. इतर मतदारसंघांतील उमेदवार शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.


राजू तोडसाम यांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा 
आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजप कोणाला मैदानात उतरवते याबाबतची उत्सुकता असतानाच माजी आमदार राजू तोडसाम यांनी शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतल्याने आर्णीमधून भाजपच्या वतीने तोडसाम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजू तोडसाम यांनी शिवाजीराव मोघे यांचा पराभव करून भाजपतर्फे विधानसभा गाठली होती. तोडसाम यांना ८६ हजार ९९१ तर मोघे यांना ६६ हजार २७० मते मिळाली होती. त्यामुळे यंदा या मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित आहे.

Web Title: Waiting for Congress list continues; Raju Todsam joined BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.