राळेगाव बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 09:50 PM2019-04-24T21:50:09+5:302019-04-24T21:50:34+5:30
येथील बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन सहा महिने लोटले. मात्र या बसस्थानकाला अद्याप उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. उद्घाटनाअभावी सहा महिन्यांपासून प्रवाशांना बसची वाट बघत उघड्यावर उभे राहावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : येथील बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन सहा महिने लोटले. मात्र या बसस्थानकाला अद्याप उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. उद्घाटनाअभावी सहा महिन्यांपासून प्रवाशांना बसची वाट बघत उघड्यावर उभे राहावे लागत आहे.
दोन वर्षांपूर्वी येथील जुने बसस्थानक पाडून नवे बसस्थानक बांधण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र सहा महिन्यांत करावयाच्या बांधकामाला तब्बल दीड वर्षे लागले. आता कसे तरी एकदाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या स्थानकाला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. या ठिकाणावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांना ऊन-वारा-पाऊस सहन करीत ये-जा करावी लागत आहे.
बसस्थानकात अद्याप विजेसह अनेका कार्य बाकी आहे. त्यातच पुढील वर्षांचा विचार करून हे बसस्थानक बांधण्यात न आल्याने आत्ताच प्रवासी संख्येच्या दृष्टीने ते लहान पडू लागले आहे. ग्रामीण फेऱ्यांकरिता समोर काही फलाट बांधणे आवश्यक आहे. येथून दररोज १६० बसेस ग्रामीण व शहरी भागात ये-जा करतात. मात्र राळेगाव आगारात केवळ ३० बसेस उपलब्ध आहे. त्यातील काही बसेस भंगार झाल्या आहेत. आता लग्नसराई व उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती संख्या पाहता पाच नवीन बसेस या डेपोला उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
नव्या बसस्थानकात कँटीन, हॉटेल, बुकस्टॉलची सुविधा आहे. त्याचा लिलावही झाला आहे. मात्र शुभारंभाअभावी या सेवा सुरू होऊ शकलेल्या नाही. येथे साधे येथे वेळापत्रकही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रकांना प्रवाशांना वारंवार विचारणा करावी लागते.
नवीन टायमिंग सुरू करा
राळेगाव-नागपूर व्हाया-हिंगघाट, राळेगाव-चंद्रपूर व्हाया खैरी-मांढळी-वरोरा आणखी दोन-दोन टायमिंग सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर रात्रीचे किमान दोन टायमिंग सुरू करावे व राळेगाव-यवतमाळ हे अंतर सहा किलोमीटर स्टेजप्रमाणे सातच स्टेजचे असताना घेतले जात असलेलया आठ स्टेजचे जादा भाडे रद्द करावे, अशी मागणी तालुका ग्राहक पंचायतने केली आहे.