महिला बचतगटाचे कर्ज माफ करा
By admin | Published: June 29, 2017 12:12 AM2017-06-29T00:12:13+5:302017-06-29T00:12:13+5:30
मायक्रो फायनान्स कंपनीकडून वितरित करण्यात आलेले कर्ज पठाणी पद्धतीने वसूल करण्यात येत आहे.
राज्य शासनाचा निषेध : ‘आप’च्या नेतृत्वात तहसीलवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मायक्रो फायनान्स कंपनीकडून वितरित करण्यात आलेले कर्ज पठाणी पद्धतीने वसूल करण्यात येत आहे. या कंपन्यांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि महिला बचतगटाचे कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात महिलांनी तहसील कार्यालयावर धडक दिली.
मायक्रो फायनान्सचे वसुली अधिकारी कर्जाची वसुली करताना शिवीगाळ करतात. रात्री अपरात्री वसुलीसाठी घरापर्यंत धडकतात. महिला बचतगटाकडून पुरूष अधिकारी कर्ज वसुली करीत आहेत. राज्य शासनाने या संदर्भात फायनांन्स कंपन्याचे कर्ज वसुलीबाबत विभागीय आयुक्ताच्या नेतृत्वात समिती गठीत करण्यात आली. अद्यापही त्याचा अहवाल आला नाही.
शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू करण्यात याव्या, घरकूल योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला. या गैरव्यव्हाराची चौकशी करण्यात यावी, अर्धवट राहिलेले घरकुल पूर्ण करण्यात यावा. राज्यात तातडीने दारूबंदी करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन शेजाळ यांना देण्यात आले.
आम आदमी पार्टीेचे संयोजक वसंत ढोक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुनंदा सावरकर, किशोर सावरकर, विलास वाडे, गुणवंत इंदूरकर, पुष्पा पोहनकर, संजय ढोले, मनिष माहूरकर, वकील शेख, अमरोज शेख, मनोहरराव विरूळकर, अजय शर्मा सहभागी झाले होते.