सोयाबीनच्या पसरवलेल्या ढिगांपुढे रात्रभर जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 06:00 AM2019-11-16T06:00:00+5:302019-11-16T06:00:05+5:30
बाजार समितीच्या गेटपासूनच घाणीला प्रारंभ होतो. सांडपाणी पसरलेले...मोकाट कुत्र्यांचे अथक केकाटणे... आणि सर्वत्र घुमत असलेला कुजका वास नाकातोंडात गेल्यावर होणारी जीवाची जळजळ... हे सारे सोसत दिवसभर घामाघुम झालेले कास्तकार पुन्हा त्याच ठिकाणी अख्खी रात्र कशी काढत असतील? काढावीच लागते. कारण त्यांच्या कष्टाचा खजिना त्यांनी दलालांपुढे उघडा मांडून ठेवलेला असतो, तो चोरांपासून तर वाचवायचाच असतो; पण कोणत्या वेळी कोणता दलाल येईल अन् भाव करून काटे करेल याचा नेम नाही. म्हणून रात्रभर जागणे आलेच.
अविनाश साबापुरे । रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ बाजार समितीत सोयाबीन विकण्यासाठी आलेले कास्तकार संतापाने बोलत होते. यंदा परतीच्या पावसाने सोयाबीनचा ‘नासोडा’ केला. त्यानंतर आता सोयाबीन विक्रीची घाई सुरू झाली आहे. पण बाजार समितीत आल्यावर चार-चार दिवस ‘काटा’च होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हालअपेष्टा भोगत बाजार समितीतच उघड्यावर थंडीत कुडकुडत रात्र जागून काढावी लागत आहे. रात्रभर सोयाबीनच्या शेजारी ‘बिन सोया’ मुक्कामी राहणाºया कास्तकारांचा गुरूवारी रात्री घेतलेला हा ‘ऑन द स्पॉट’ वृत्तांत...
बाजार समितीच्या गेटपासूनच घाणीला प्रारंभ होतो. सांडपाणी पसरलेले...मोकाट कुत्र्यांचे अथक केकाटणे... आणि सर्वत्र घुमत असलेला कुजका वास नाकातोंडात गेल्यावर होणारी जीवाची जळजळ... हे सारे सोसत दिवसभर घामाघुम झालेले कास्तकार पुन्हा त्याच ठिकाणी अख्खी रात्र कशी काढत असतील? काढावीच लागते. कारण त्यांच्या कष्टाचा खजिना त्यांनी दलालांपुढे उघडा मांडून ठेवलेला असतो, तो चोरांपासून तर वाचवायचाच असतो; पण कोणत्या वेळी कोणता दलाल येईल अन् भाव करून काटे करेल याचा नेम नाही. म्हणून रात्रभर जागणे आलेच.
गेल्या आठवडाभरापासून यवतमाळ बाजार समितीत रात्रभर अगदी जत्रा दिसतेय. दाढीचे खुंट वाढलेले.. डोक्यावर मळका शेला गुंडाळलेले कास्तकार... इथून तिथे अन् तिकडून इकडे धावपळ करताना दिसतात. रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत ही धावपळ झाली की थकलेले जीव भाकरी सोडून सोयाबीनच्या ढिगाजवळ दोन घास खावून दोन घोट पाणी पिवून आडवे होतात. पण घरून आणलेल्या फाटक्या ब्लँकेटने त्यांचे अंगही पूर्ण झाकले जात नाही अन् दु:खही लपत नाही. कण्हने, कुंथने पहाटेपर्यंत अखंड राहू नये म्हणून मध्येच कोणीतरी तंबाखाची चिमूट चोळत बसतो अन् बाजूच्या कास्तकाराला ‘का हो भाऊजी कई होईन आपला काटा?’ असे विचारत ढकलून दिली जाते रात्र...
कळंब तालुक्यातून बेलोरी गावातून आलेले महादेव घोडाम घरून आणलेला डब्बा उघडून जेवत होते. ते म्हणाले, आमी पाण्याच्या पयले काहाडलं सोयाबीन म्हणून वाचलं. बाकी तं पक्के मेलेच. संपूर्ण जिल्ह्यातच शेतकºयांची ही अवस्था आहे.
पाच रुपयांत दोन भाकरी अन् बेसन
बाजार समितीच्या परिसरात शेतकºयांसाठी स्वस्त जेवण उपलब्ध करून दिल्याचा दावा बाजार समितीने केला आहे. मात्र या कँटीनमध्ये जेवणासाठी दलालाचा पास न्यावा लागतो. त्या पासवर दोन भाकरी, बेसन मिळते. त्यात कोणत्याच कास्तकाराचे पोट भरत नाही. ‘एक्स्ट्रा’ भाकर १५ रुपयांची दिली जाते. साहजिकच पाच रुपयांचा पास नेणाऱ्या कास्तकाराच्या खिशातून ५० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जाते. पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून एक रांजन आहे. त्यावरची घाण पाहिल्यानंतर पाण्यातूनच कास्तकारांच्या पोटात आजार शिरण्याची धास्ती आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर केवळ भात दिला जात आहे. अखेर लोनाडी (ता. नेर) येथील शेतकरी राजकुमार चव्हाण यांनी शुक्रवारी थेट बाजार समिती सभापतींना फोन करून भाकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तेव्हा कुठे शनिवारी दिवसा ३०० आणि रात्री ६५ शेतकऱ्यांनी या कँटीनमध्ये जेवण केले.
भावातही दलालांचीच मनमानी
शुक्रवारी यवतमाळ बाजार समितीत सोयाबीनचे दर ३७०० रुपयांपर्यंत वर आले होते. पण तरीही चार दिवसांपासून येथे सोयाबीन घेऊन आलेल्या कास्तकारांना कमी भाव सांगितला गेला. लोनाडीचे राजकुमार चव्हाण, सिंदखेडचे नरेंद्र खडसे, नागापूरचे वासूदेव राठोड, तिवसाचे गजानन टेकाम, वाई हातोलाचे वसंत राठोड, सोनखासचे श्रीराम मानतुटे यांनी ही व्यथा मांडली. ते म्हणाले, आमच्या ढिगावरी ३७०० चा भाव सांगत दलाल येते. पण आमच्या ढिगाजवळ आला का भाव तीन हजाराच्या वर सरकतच नाई. मंग आज आमी दलालायले येऊ देनंच बंद करून टाकलं. बेलोराचे संतोष सोळंके, कारेगावचे राजकुमार काटेखाये, मेंढलाचे रामराव खडसे, मेहराबादचे विजय पाटील यांनीही हाच संताप बोलून दाखविला.
यवतमाळ : घाम नाई बावाजी रगत आटवा लागते मातीत.. तवा निंगते सोयाबीन. आन् येवढ्या मेह्यनतीनं पिकवलं का मंग इथसा कोनी घ्याले नाई तय्यार. पोटच्या पोरावानी सोयाबीनचं पोतं रिचवून त्याच्याकाठी झोपा लागून रायलं. कोनी मंते अज होईन काटा, कोनी मंते उद्याबी होईन का नाई गॅरंटीस नाई... आपलं सरकार झालं बेक्कार राजेहो.. कवा भाजपचं होईन मंते, शिवसेनेचं होईन मंते, मंदातच कांगरेसवाले, राष्टवादीवालेबी करीन मंते सरकार... आमचे हाल कुत्रंय इचारत नाई.. भईन कसंई आलं सरकार तरी सब्बन मरगाड आमच्यावरस..!