वणीत क्रिकेट सट्टा तेजीत
By admin | Published: May 22, 2016 02:18 AM2016-05-22T02:18:10+5:302016-05-22T02:18:10+5:30
वणी शहरात आयपीएल क्रिकेट सट्टा तेजीत सुरू आहे. हा सट्टा ‘मोबाईल टू मोबाईल’ सुरू असल्याने पोलिसांनाही सट्टेबाजांचा शोध लागणे कठीण झाले आहे.
सट्टेबाजांचा शोध लागेना : ‘मोबाईल टू मोबाईल’ सेवा
वणी : वणी शहरात आयपीएल क्रिकेट सट्टा तेजीत सुरू आहे. हा सट्टा ‘मोबाईल टू मोबाईल’ सुरू असल्याने पोलिसांनाही सट्टेबाजांचा शोध लागणे कठीण झाले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात आयपीएल सट्टा सुरू असल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत गेल्या दोन महिन्यात एकूण ५२ सामने झाले आाहे. गेल्या ११ एप्रिलपासून स्पर्धा सुरू झाली. आता केवळ पाच सामने बाकी आहे. २७ मे रोजी फायनल होणार आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात मोबाईलद्वारे सट्टा लावला जात आहे. मोबाईलवर मॅसेज पाठवून संबंधित चमूचा रेट ठरल्याचे ग्राहकांना सांगण्यात येते. त्यानुसार ग्राहक दररोज ९० हजार ते एक कोटीपर्यंत सट्टा लावत असल्याची चर्चा जोरात आहे. यात उच्चभू्र घरातील युवक व काही प्रतिष्ठीत अडकले आहेत.
शहरात एका मुख्य ठिकाणी बसून हे सट्ट्याचे सूत्र हालविण्यात येत आहे. सामना सुरू असतो, त्यावेळी संबंधित ‘बुकी’ आपल्या दूरचित्रवाणी संचासमोर मोबाईलवर ग्राहकांच्या संपर्कात असतो. तो त्यावेळी बाहेर निघत नाही व कुणाच्या संपर्कातसुद्धा येत नाही. मात्र एजंटमार्फत तो सतत ग्राहकांच्या संपर्कात राहतो. वणी शहरात मोठ्या प्रमाणात पैसा असल्याचा सर्वांचा समज आहे. त्यामुळे वरोरा-चंद्रपूरचे एजंटही ग्राहकांच्या शोधात वणीत ठाण मांडून बसले आहे.
बाहेर जिल्ह्यातील हे एजंट मोबाईलद्वारे सतत ग्राहकांच्या संपर्कात राहतात. व्हॉट्स अॅपवर मॅसेज पाठवून रेटची माहिती देतात. काही दिवसांपूर्वी बेंगलोर ८६ ते ८९, मुंबई भारी १८२ ते १८५, बेंगलोर भारी १८५ ते १८८, हैद्राबाद २.५५, गुजराथ ३९, कलकत्ता ४.२० पैसे रेटप्रमाणे दर होता, असे सांगितले जाते. दररोज ज्या संघाचा खेळ असतो, त्या संघाचे रेट मोबाईलद्वारे ग्राहकांना सांगण्यात येतात. आत्तापर्यंत या अवैध सट्ट्यात पडून अनेक मोठ्या कुटुंबातील मंडळी कंगाल झाली आहे. सतत तोटा येत असल्याने काहींनी अखेर नावडत्या युवतींसोबत विवाह उरकून नागपूर गाठले आहे. गेल्यावर्षी शहरातील एका व्यक्तीच्या घरावर सट्ट्यातील पैशाच्या वादातूनच हल्ला झाल्याची चर्चा आहे. आत्तापर्यंत काहींनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रकार आयपीएलमुळे होत असल्याची माहिती समोर येत आहे. हा सर्व सट्टा मोबाईल टू मोबाईल चालतो. त्यामुळे कोण, किती, या खेळामध्ये डुबला किंवा तरला, हे कुणालाच माहिती पडत नाही. केवळ बुकी आणि सट्टा घेणाऱ्यांनाच त्याची माहिती असते. मात्र कालांतराने सामान्य नागरिकांनाही वस्तुस्थिती नजरेस येते. मोबाईलमुळे या सट्ट्याचे हातपाय बाहेर दिसत नसून त्यामुळे पोलिसही चक्रावून शांत बसून आहे. पोलिसांचे अवैध दारूकडे मात्र बरोबर लक्ष आहे. अवैध दारूमुळे कदाचित डी.बी. पथकालाही आयपीएल सट्ट्याच्या ठिकाणाचा शोध लागत नसावा, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)
$$्रिपोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क कोलमडले
पोलिसांचे खबरेसुद्धा वणीतील आयपीएल सट्ट्याची माहिती पोलिसांना देण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच गेल्या महिन्यापासून या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची चर्चा सुरू आहे. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत जवळपास ५२ सामने झाले आहेत. मात्र एकदाही कारवाई झालेली नाही. डी.बी पथकासोबतच यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही अपयशी ठरत आहे. त्यांचेही वणीकडे लक्ष नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या पथकाने वणीत आयपीएल दरम्यान हमखास धाड पडणार असल्याचे सुतोवाच केले होते. मात्र त्यांचा तो दावादेखील आता फोल ठरत आहे.