घरकुलाच्या निधीसाठी दिग्रसच्या लाभार्थ्यांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:41 AM2021-05-14T04:41:15+5:302021-05-14T04:41:15+5:30
दिग्रस : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेकांना घरकुल मंजूर झाले. योजनेचे चार हप्ते लाभार्थ्यांना मिळाले. मात्र, आता पाचव्या हप्त्यासाठी लाभार्थी ...
दिग्रस : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेकांना घरकुल मंजूर झाले. योजनेचे चार हप्ते लाभार्थ्यांना मिळाले. मात्र, आता पाचव्या हप्त्यासाठी लाभार्थी वणवण भटकत आहेत.
प्रत्येकाला राहण्यासाठी हक्काचे घर असावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बेघरांना घरकुल देण्याची योजना तयार करण्यात आली. स्थानिक पातळीवर शहरात नगरपालिका व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीत अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. काही वर्षांपूर्वी येथील सुरज नगरमधील लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला. त्यांना घरकुल मंजूर झाले.
यानंतर कसेबसे करत लाभार्थ्यांनी घराचा पाया उभारण्यास सुरुवात केली. नंतर पालिकेने त्यांना घराचे चार हप्ते प्रदान केले. मात्र, आता पाचव्या हप्त्यासाठी लाभार्थी नगरपालिकेच्या चकरा मारत आहेत. वणवण भटकत आहेत. लाभार्थ्यांनी उसनवारी करून घराचे बांधकाम पूर्ण केले. उर्वरित पाचव्या हप्त्यासाठी गेल्या एक वर्षापासून लाभार्थी चकरा मारत आहेत. मात्र, पालिका प्रशासन त्यांना ‘आता नाही उद्या या, उद्या नाही परवा या, सध्या काम आहे, नंतर या’, अशी कारणे सांगून परत पाठवत आहे. यामुळे रेखा प्रकाश तिडके यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे.