वणी-घुग्गुस चौपदरी सिमेंट रस्त्याला अल्पावधीतच तडे
By Admin | Published: January 5, 2016 02:56 AM2016-01-05T02:56:34+5:302016-01-05T02:56:34+5:30
करंजी-घुग्गुस या राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरू आहे. मात्र आत्तापर्यंत झालेले कामही
वणी : करंजी-घुग्गुस या राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरू आहे. मात्र आत्तापर्यंत झालेले कामही दर्जेदार झाले नाही. या मार्गावर अनेक तडे गेले आहे. त्यामुळे रस्ता तयार करणाऱ्या कंपनीकडून आता ठिकठिकाणी मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे.
करंजी ते घुग्गुस या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. त्यामुळे या मार्गाचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. करंजी ते परसोडा फाट्यापर्यंत तीन पदरी डांबरीकरण व परसोडा फाटा ते घुग्गुसपर्यंत चार पदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता व घुग्गुस ते पडोली फाटा चार पदरी डांबरी बनविण्याचे काम गेल्या सहा वर्षापूर्वी एका कंपनीला देण्यात आले. डिसेंबर २०१२ पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र अजूनही या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही.
रूंदीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली हजारो मौल्यवान झाडे तोडण्यात आली. मात्र या झाडांऐवजी दुसरी झाडे लावण्याचे औदार्य रस्ता बांधकाम कंपनीने दाखविले नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता बोडखा दिसत आहे. रस्त्याचे बांधकाम धीम्या गतीने होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता उंच केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून शेतमालाचे नुकसान होत आहे. साचलेले पाणी बाहेर काढण्याची व्यवस्थाही रस्ता कंपनीने केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर नवीनच संकट ओढवले आहे.
कित्येक गावात जाणारे, शेतात जाणारे रस्ते मोडल्यामुळे वाहने, बैलगाड्या कोठून न्याव्या, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यालगतच्या गावासाठी अॅप्रोच मार्ग करून देण्याची तरतूद असूनही कंपनीचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वणी ते घुग्गुस दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्ता बनविला. मात्र या रस्त्याला आत्ताच जागोजागी तडे गेले आहे. त्यामुळे हा रस्ता पुढे वाहतुकीला साथ देईल काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या रासायनिक पदार्थाने रस्त्यावरील फटी बुजविण्याचे काम सुरू आहे. ही मलमपट्टी कायमस्वरूपी टिकेल काय?, हासुद्धा प्रश्नच आहे. काही ठिकाणी रस्त्याची पातळी बिघडल्याने धावती वाहने उसळतात. त्यामुळे कंपनी रस्ता बनविताना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली बनवित आहे की नाही, असाही प्रश्न पडतो. बांधकाम विभागाचेही रस्त्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पथकर नाक्यांची उभारणी सुरू
४रस्त्याचे बरेच बांधकाम अद्याप शिल्लक आहे. मात्र कंपनीने रस्त्यावरील पथकर वसूल करण्यासाठी पथकर नाक्यांची उभारणी सुरू केली आहे. करंजी व वणीच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ पथकर नाके उभारले गेले आहे. कंपनीने रस्ता वाहतुकीस ठणठणीत तयार करावा, त्यानंतरच पथकर सुरू करावा, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे.