वणी तालुक्यात खरिपाची ३० टक्के पेरणी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:33 PM2018-06-13T22:33:11+5:302018-06-13T22:33:11+5:30
यंदा मॉन्सून अगदी वेळेवर दाखल झाल्याने व सुरूवातीच्या चार दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने त्या बळावर शेतकऱ्यांनी कपाशीची टोबणी केली खरी; पण गेल्या तीन दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : यंदा मॉन्सून अगदी वेळेवर दाखल झाल्याने व सुरूवातीच्या चार दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने त्या बळावर शेतकऱ्यांनी कपाशीची टोबणी केली खरी; पण गेल्या तीन दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. येत्या २४ तासांत पाऊस न आल्यास टोबणी केलेले कपाशीचे बी धरित्रीच्या उदरातच करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मृग नक्षत्रावर पावसाचे आगमन झाले. सुरूवातीचे चार दिवस १०८ मि.मी.पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. हा पाऊस कायम राहील, या आशेवर शेतकºयांनी कपाशीच्या लागवडीला प्रारंभ केला. आजच्या तारखेत जवळपास ३० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. वणी तालुक्यात ६४ हजार ३० हेक्टर जमिन वहितीखाली आहे. त्यातील १३ हजार ७४० हेक्टरवर आजपर्यंत कपाशीची लागवड आटोपली आहे. ८६३ हेक्टरवर तूर पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत शेतात ओल असल्याने या पिकांची स्थिती उत्तम होती. बुधवारी पाऊस येईल, अशी आस लावून शेतकरी बसले होते. मात्र दिवसभर तीव्र उन्हं होते. वाढत्या तापमानाने जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. कर्ज काढून शेतात पेरलेले बियाणे करपून तर जाणार नाही ना, ही भीती शेतकºयांच्या मनात आहे. अद्याप शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीला सुरूवात केली नाही. मात्र आठ ते नऊ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार असल्याचा अंदाज तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.