अवयव दानासाठी वर्धा ते नागपूर ग्रीन कॉरिडोअर

By admin | Published: January 12, 2017 03:59 PM2017-01-12T15:59:25+5:302017-01-12T15:59:25+5:30

यवतमाळ येथील येथील ४४ वर्षीय ब्रेनडेड (मेंदू मृत्यू) इसमाचे अवयवदान करण्यात आले

Wardha to Nagpur Green Corridor for organ donation | अवयव दानासाठी वर्धा ते नागपूर ग्रीन कॉरिडोअर

अवयव दानासाठी वर्धा ते नागपूर ग्रीन कॉरिडोअर

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १२ -  मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचे महत्त्व आता समाजात हळूहळू रुजू लागले आहे. विशेषत: नातेवाईक व रुग्णालयाच्या पुढाकाराने इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण ठरत आहे. याचाच प्रत्यय गुरुवारी पहाटे आला. यवतमाळ येथील येथील ४४ वर्षीय ब्रेनडेड (मेंदू मृत्यू) इसमाचे अवयवदान करण्यात आले. यकृत व दोन मूत्रपिंडांसाठी वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथून ते नागपूरपर्यंत ग्रीन कॉरिडोअर करण्यात आले. यामुळे तिघांना जीवनदान मिळाले. 
  पुरुषोत्तम वासुदेवराव गोडे (४४) रा. बाभुळगाव यवतमाळ यांना अपघात झाल्याने ९ जानेवारीला सावंगी-मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोडे यांचे ब्रेनडेड झाले होते. रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मंजुरीनंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यांनी पुढाकार घेऊन लगेच उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या केंद्राच्या प्रतिक्षा यादीनुसार मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयाशी संपर्क साधण्यात आला. तेथे यकृताच्या प्रतीक्षेत रुग्ण असल्याचे सांगून त्यांनी नागपूरहून मुंबईला हलवण्याकरिता सोय उपलब्ध करून दिली
 
वर्धा-नागपूर-मुंबई यकृताचा प्रवास 
बुधवारी पहाटे १ वाजता शस्त्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. पहाटे ५ वाजता सावंगी मेघे वर्धा येथून नागपूर विमानतळपर्यंत ग्रीन कॉरिडोअरने यकृत पोहचविण्यात आले. यावेळी पोलिसांचे वाहन, दोन अ‍ॅम्ब्युलन्स सोबत होत्या. तिकडे मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाला पहाटे ४ वाजता सुरूवात झाली होती. सकाळी ७.५५ वाजता नागपूर विमानतळाहून मुंबई विमानाने यकृतच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. साधारण ९.३० वाजताच्या सुमारास संबंधित रुग्णावर यशस्वी प्रत्यारोपण करुन जीवनदान मिळाले. 
 
नागपुरच्या दोन इस्पितळांना मिळाले मूत्रपिंड
मूत्रपिंड काढण्याची शस्त्रक्रिया पहाटे ५ वाजता सुरू झाली. यातील एक मूत्रपिंड नागपूरच्या आॅरेंजसिटी हॉस्पिटलला तर एक केअर हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आली. रुग्णाचे दोन बुबूळ आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या नेत्रपेढीमध्ये दान करण्यात आले. 
 
हृदयदान होऊ शकले नाही 
या एकूणच प्रकरणाची माहिती देत असताना वेळेत हृदयदान होऊ शकले नाही अशी खंत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाबाजी घेवडे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, हृदय प्रत्यारोपणासाठी औरंगाबादच्या ‘सिग्मो’ हॉस्पिटलने तयारी दर्शवली. विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येणार होती. चार तासांत हृदयाचे प्रत्यारोपण होणे आवश्यक होते, मात्र सावंगी मेघे ते नागपूर विमानतळ व नंतर औरंगाबादच्या प्रवासाला चार तासांपेक्षा जास्त वेळ लागणार होता.  परिणामी हा निर्णय मागे घेण्यात आला. भविष्यात हेलीकॉप्टरची सोय झाल्यास, अवयवदान चळवळीला आणखी गती येईल, असेही ते म्हणाले.
 
या डॉक्टरांचा होता सहभाग
मुंबई येथील डॉ. सोमनाथ चट्टोपाध्याय, आचार्य विनोबा भावे ग्रा. रुग्णालयाचे डॉ. प्रसाद इंगळे, डॉ. अभिजीत ढाले, डॉ. चौधरी, डॉ. संदीप ईरटवार, डडॉ. रुपाली नाईक, राजेश सव्वालाखे, डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवी वानखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले. 

Web Title: Wardha to Nagpur Green Corridor for organ donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.