लाखोंना जगविणारी वर्धा नदी मरणाच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 10:12 PM2019-05-26T22:12:15+5:302019-05-26T22:12:43+5:30
सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल्यासारखी होऊन जाते. काही ठिकाणी या नदीचे रुपांतर चक्क डबक्यात होऊन जाते.
के.एस.वर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : सहा जिल्हे आणि जवळपास २५ तालुक्यांतील लाखो लोकांसाठी जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचेच अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी बारमाही वाहणारी वर्धा नदी आता एक-दोन महिने सोडले तर कोरडीठक्क असते. पावसाळा संपताच तिचे पात्र संकुचत होते. अनेक ठिकाणी तर ती नाल्यासारखी होऊन जाते. काही ठिकाणी या नदीचे रुपांतर चक्क डबक्यात होऊन जाते. वर्धा नदीचा असाच ऱ्हास होत राहिला तर काही वर्षात तिचे केवळ नावच शिल्लक राहण्याचा धोका आहे.
एकेकाळी हिरवागार राहणारा वर्धा नदीकाठावरील परिसर आता ओसाड होत चालला आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या शेतीचे सिंचन, ग्रामीण-शहरी भागातील नळयोजना, जनावरांसाठी उपलब्ध पाणी आणि चारा, मासे उत्पादन, टरबुज, डांगर, शिंगाडे आदींची शेती, नदीमुळे आसपासच्या गावात टिकून असलेली भूजल पातळी, उद्योग व्यवसाय आदी गोष्टींवर आताच परिणाम होऊ लागला आहे.
देशात नदीजोड प्रकल्पाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही ठिकाणी त्यावर कामेही सुरू झाली आहे. गंगा स्वच्छता अभियानावरही कोट्यवधी रुपये खर्च केल्या जात आहे. नमामी गंगे, नर्मदा परिक्रमा आदी कार्यक्रमांद्वारे या नद्यांचे महत्व समजून ते टिकविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. राजस्थानमधील जलदूत राजेंद्र सिंग यांनी लोकचळवळ उभारून दुष्काळाच्या छायेत मृतप्राय झालेल्या विविध नद्या बारामाही वाहत्या केल्या आहे. वर्धा नदी कोरडी पडल्याने परिसरातील नळयोजना, विहिरी, हातपंप कोरडे पडले. त्यामुळे नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना टँकर वा तत्सम साधनाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे, विविध उपाययोजना करण्यात पर्यायाने जनतेचा पैसा खर्च होत आहे.
वर्धा नदी बारामाही वाहती राहावी याकरिता शासनस्तरावर कृती आराखडा बनवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तोपर्यंत नदीपात्राच्या परिसरातील गावे, शहरे, तालुके, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या परीने लोकचळवळ उभारून वर्धा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. नदीपात्रात उभी नांगरणी करणे, नदीपात्र खोल व रूंद करणे, पात्राच्या कडेचे क्षेत्र स्वच्छ, साफ करून मोकळे करणे आवश्यक आहे. याकरिता अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील धुरिणांनी आपआपला सहयोग मे-जून महिन्यात देणे आवश्यक झाले आहे.
असा आहे वर्धा नदीचा उदयास्त
वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई तालुक्यातून झाला आहे. बैतुल जिल्ह्यानंतर अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून ती वाहते. ३०० किलोमीटरपेक्षा अधिक लांब वाहणारी ही विदर्भातील महत्त्वपूर्ण नदी गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वैनगंगा नदीत विलीन होते.