वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग भूसंपादनाचा मोबदला वितरित
By admin | Published: April 7, 2017 02:21 AM2017-04-07T02:21:54+5:302017-04-07T02:21:54+5:30
जिल्ह्याच्या विकासातील महत्वाकांक्षी वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी थेट जमिनीची खरेदी करण्याची मुभा शासनाने दिली.
सहा कोटींचे वाटप : कळंब तालुक्यातील ४८ शेतकऱ्यांना लाभ
यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासातील महत्वाकांक्षी वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी थेट जमिनीची खरेदी करण्याची मुभा शासनाने दिली. आता या मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार गुरुवारी कळंब तालुक्यातील चापर्डा व घोटी या दोन गावांतील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या गावात जाऊन खरेदी-विक्री दराच्या चारपटीने जादा मोबदला वितरित करण्यात आला.
या मार्गासाठी कळंब आणि यवतमाळ तालुक्यातील २९४ हेक्टर जमीन, तर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकूण एक हजार १४६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार ११ प्रकरणातील ४३ हेक्टर जमिनीचा पाच कोटी ४८ लाखांचा मोबदला जानेवारी २०१६ मध्ये देण्यात आला. त्यानंतर नवीन भूसंपादन कायदा लागू झाला. नवीन कायद्यानुसार जमीन संपादित करताना जनसुनावणी घेणे बंधनकारक होते. मात्र जिल्हा प्रशासन व भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांनी यातून सूट मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न केले. ही सूट मिळाल्यानंतर कलम ११ ची प्रक्रिया तीन वर्षात पूर्ण करण्याऐवजी दहा महिन्यातच पूर्ण करून अवार्ड घोषित करून शेतकऱ्यांना मोबदला वाटप केले जात आहे.
कळंब तालुक्यातील घोटी येथील २२.०९ हेक्टर, तर चापर्डा येथील १४.५९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. त्यापोटी घोटी येथील ३१ शेतकऱ्यांना तीन कोटी ४० लाख ७६ हजार ७३५, तर चापर्डा येथील १७ शेतकऱ्यांना दोन कोटी ४८ लाख ९८ हजार १६५ रूपयांच्या मोबदल्याचे गुरूवारी गावात जाऊन वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, विशेष भूसंपादन अधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, कळंबचे तहसीलदार रणजित भोसले, चापर्डाच्या सरपंच सरला बंडाते यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते या मोबदला व जमीन संपादन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी परिसराच्या विकासासाठी रेल्वेचे फार मोठे योगदान असते, असे सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असून व्यापारासोबतच शिक्षण व अन्य क्षेत्रातील विकासालाही हा मार्ग सिंहाचा वाटा उचलेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात यापूर्वीच रेल्वे मार्ग असता तर, शेतकऱ्यांवर यावर्षी कमी दरात तूर विकण्याची वेळ ओढवली नसती. किमान हजार ते पंधराशे रूपये त्यांना जादा मिळाले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मदत
या मोबदल्यामुळे पुढील हंगामाकरिता शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध झाले. तसेच त्यांना दुसरीकडे मालमत्ता खरेदीसाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे. याशिवाय या प्रकरणातील संपूर्ण दस्तावेज अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यात संयुक्त मोजणी अहवाल, मूल्यांकन, फळझाडे, वनझाडे, विहीर, अंतिम निवाडा आदी बाबी शेतकऱ्यांना आर्नलाईन उपलब्ध असणार आहे.