वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग ‘ट्रॅक’वर
By admin | Published: February 5, 2017 12:55 AM2017-02-05T00:55:01+5:302017-02-05T00:55:01+5:30
विदर्भ व मराठवाडा विभागाला जोडणारा आणि राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झालेला वर्धा-यवतमाळ-नांदेड
यवतमाळ : विदर्भ व मराठवाडा विभागाला जोडणारा आणि राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झालेला वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी ७३८ कोटींची तरतूद सामान्य अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या निधीसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात आल्याचे खासदार भावना गवळी यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे. २६० किलोमीटरच्या या प्रकल्पास लागणारी जमीन थेट खरेदी पद्धतीने संपादन करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन थेट भूसंपादनाचा प्रस्ताव गृह (परिवहन) विभागाकडून रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्याचेही काम सुरू होवून येणाऱ्या काळात या रेल्वेचा फायदा होणार आहे. सदर रेल्वेमार्ग विहित किमतीत आणि कालावधीत पूर्ण व्हावा यासाठी थेट पद्धतीने भूसंपादनाची प्रक्रिया करावी, अशी विनंती केल्यामुळेच रेल्वेमंत्र्यांनी या प्रकरणी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकार किंवा रेल्वे बोर्डाकडून थेट पद्धतीने भूसंपादन करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे खासदार भावना गवळी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)