जिल्ह्यात प्रतिबंधित अवैध गुटख्याची डझनावर गोदामे
By Admin | Published: June 28, 2017 12:28 AM2017-06-28T00:28:30+5:302017-06-28T00:28:30+5:30
पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या मेहेरबानीवर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याचा राजरोसपणे सर्वदूर व्यापार सुरू आहे.
पोलीस-एफडीए मेहेरबान : कारंजा, अमरावतीवरून थेट पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या मेहेरबानीवर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याचा राजरोसपणे सर्वदूर व्यापार सुरू आहे. गुटख्याची ठिकठिकाणी गोदामे असून त्यांना ‘वसुली’ करणाऱ्या पोलिसांचे सुरक्षा कवच लाभले आहे.
जिल्ह्यात कारंजा व अमरावती येथून खास गुटख्याचा पुरवठा केला जातो. ‘मिलीभगत’ असल्याने कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची कारंजा व अमरावतीवरून निघणारी ही वाहने अडविली जात नाही. जणू पोलीस संरक्षणात या वाहनांचा वणीपासून उमरखेडपर्यंतचा प्रवास सुखरुप पार पडतो. शनिमंदिर चौक, लोखंडी पूल, गांधी चौक ते गुजरी मार्ग अशा काही ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची मोठी गोदामे आहेत.
याशिवाय लहान साठवणूक केंद्रांची संख्याही बरीच मोठी आहे. कारंजाहून येणारा गुटखा दारव्हा, आर्णी, अकोलाबाजार, घाटंजी अशा वेगवेगळ्या भागातील सुमारे १५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोहोचविला जातो. आर्णीमध्येही गुटख्याचे प्रमुख दोन माफिये आहेत. अमरावतीवरून येणारा गुटखा उर्वरित काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोहोचतो. कारंजा व अमरावतीच्या माफियांनी जिल्ह्यातील आपली गावे वाटू घेतली आहेत. वणीतही दोन प्रमुख माफिया आहेत. असेच माफिया सर्वच उपविभागात ठाण मांडून आहेत. अमरावतीच्या गुटखा माफियाला ‘गावचा माणूस’ म्हणून पोलीस दलातून खुले अभय दिले जात आहे.
‘वसुली’साठी पोलिसांची खास यंत्रणा
एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा विचार केल्यास येथे प्रतिबंधित गुटख्यातून लाखोंची उलाढाल होते. या उलाढालीचा काही सेंटरमधून ‘सुगंध’ येतो. आर्णीत पावणे दोन कोटींच्या गुटखा धाडीने यापूर्वीच गोदामांची ही बाब सिद्ध झाली आहे. या गुटख्याची ‘वसुली’ आणि त्यातून संरक्षण पुरविण्यासाठी पोलिसांची खास यंत्रणा कार्यरत असल्याचेही बोलले जाते. जिल्ह्यात गुटखा, मटका-जुगार, दारू, अवैध प्रवासी वाहतूक अशा वेगवेगळ्या हेडवरील ‘वसुली’साठी जिल्हा मुख्यालयी पोलिसांची वेगवेगळी पथके ‘सेवा’ देतात. खास ‘वसुली’साठीच काहींची नेमणूक असून त्यांची शासकीय सेवेतील संपूर्ण एनर्जी या एकाच कामावर खर्ची होते.