सांडपाणी निर्गुडा नदीच्या पात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:28 PM2018-04-11T23:28:47+5:302018-04-11T23:28:47+5:30
निर्गुडा नदीचा जलस्तर कमी असून याच नदीचे पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जात आहे. मात्र या नदीत वणी शहरातील दामले फैल व चिखलगावातील सांडपाणी सोडले जात असल्याने नदीतील पाणी दूषित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : निर्गुडा नदीचा जलस्तर कमी असून याच नदीचे पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जात आहे. मात्र या नदीत वणी शहरातील दामले फैल व चिखलगावातील सांडपाणी सोडले जात असल्याने नदीतील पाणी दूषित होत आहे. परिणामी या पाण्यामुळे पाणी टंचाईच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यासंदर्भात नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नळाद्वारे मिळणाऱ्या दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.
यंदा कधी नव्हे ईतकी वणी शहरात पाणी टंचाई निर्माण झाली. वाढत्या तापमानाने वणी शहरातून वाहणाºया निर्गुडा नदीतील जलस्तर वेगाने घटला. यावर मात करण्यासाठी नगरपालिकेने शहरात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला. सोबतच नवरगाव धरणातून ठरल्याप्रमाणे निर्गुडा नदीत सोडले जात आहे. मात्र त्याचे प्रमाण कमी असल्याने राजूर खाणीतील पाणीदेखील निर्गुडा नदीत सोडले जात आहे. मात्र पालिकेच्या अनास्थेमुळे शहरातील दामले फैल भागासह चिखलगावातील सांडपाणीदेखील नदीला येऊन मिळत असल्याने निर्गुडा नदीतील पाणी दूषित होत आहे. वणी शहरासाठी असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र अतिशय अशक्त असून पाणी स्वच्छ करण्याची क्षमतादेखील या जलशुद्धी केंद्रात उरली नाही. केवळ शुद्धीकरणाचा फार्स केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सांडपाणी निर्गुडा नदीत सोडले जात असल्याने ईतके घाण पाणी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध होत नसल्याने नागरिकांना विविध आजाराची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर सांडपाण्याची व्यवस्था लावण्याची मागणी आहे.
घाणीचा विळखा
निर्गुडा नदीला वणी शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. दोन वर्षांपूर्वी काही समाजसेवींनी मिशन निर्गुडा नावाचे अभियान राबविले होते. या अभियानाअंतर्गत या नदीचे रुप पालटले खरे; मात्र नंतर या समाजसेवींनी या नदीकडे पाठ फिरविली. आजघडीला नदीचे काठ घाणीने अगदी बरबटले आहेत. नागरिक नदीच्या काठावर प्रात:र्विधीसाठी जातात.