राज्यातील मराठा पोलीस अधिकाऱ्यांवर महासंचालकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:46 AM2018-07-25T11:46:01+5:302018-07-25T11:50:40+5:30

तुमच्या घटक पोलीस दलात कार्यरत मराठा पोलीस अधिकाऱ्यांची संख्या किती याबाबतची माहिती आज दिवसभर राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून विविध घटक प्रमुखांना विचारली जात होती.

Watch of the Director General of Maratha Police in the state | राज्यातील मराठा पोलीस अधिकाऱ्यांवर महासंचालकांचा वॉच

राज्यातील मराठा पोलीस अधिकाऱ्यांवर महासंचालकांचा वॉच

Next
ठळक मुद्देमौखिक माहिती मागितली आंदोलनातून साईड ट्रॅक करणारनॉन-मराठांकडे बंदोबस्त सोपविण्याची तयारी

राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तुमच्या घटक पोलीस दलात कार्यरत मराठा पोलीस अधिकाऱ्यांची संख्या किती याबाबतची माहिती आज दिवसभर राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून विविध घटक प्रमुखांना विचारली जात होती.
आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. मराठवाड्यात या आंदोलनाने उग्ररुप धारण केले आहे. या आंदोलनाच्या नियंत्रणासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. परंतु आंदोलकांबाबत मराठा समाजाचे पोलीस अधिकारी काहीसा ‘सॉफ्ट कॉर्नर’ ठेवत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. काही ठिकाणी पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारीसुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले जाते. मराठा समाजाचे अधिकारी हे आंदोलन हाताळताना सौम्य भूमिका घेत असल्याच्या निष्कर्षाप्रत शासन आले असावे, म्हणूनच की काय राज्य पोलीस दलात मराठा समाजाचे नेमके अधिकारी किती, त्यांचे नेमणुकीचे ठिकाण, हुद्दा काय आदी माहिती घेतली जात आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयातून मंगळवारी राज्यभरातील घटक प्रमुखांना, राज्य सेवेच्या अधिकाऱ्यांना फोन करुन मराठा अधिकाऱ्यांची माहिती तोंडी स्वरूपात विचारली गेली. शिवाय याबाबत गोपनीयता पाळण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या. ही माहिती गोळा करुन मराठा अधिकाऱ्यांना आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी न नेमण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नॉन मराठा अधिकाऱ्यांना आंदोलनाच्या फ्रन्टवर बंदोबस्तासाठी नेमले जाऊ शकते.
यापुर्वीसुध्दा पोलीस दलातील मराठा अधिकाऱ्यांची माहिती लेखी स्वरूपात मागण्यात आली होती. परंतु आरक्षण लागू करणे हा हेतू त्यामागे होता, हे विशेष!

पोलीस दलातील पहिलाच प्रकार
अधिकाऱ्यांची जात विचारुन त्यांना समाजाच्या आंदोलनातील बंदोबस्तापासून दूर ठेवण्याचा हा प्रकार महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे मानले जाते. या प्रकाराबाबत मराठाच नव्हे तर सर्वच समाजाच्या पोलीस अधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर ऐकू येतो आहे.

पंढरपुरातील राग तर नव्हे?
राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी पंढरपूरला मानाच्या पूजेसाठी जातात. परंतु यावेळी मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना तेथे जाता आले नाही. या रागातून तर आता मराठा पोलीस अधिकाऱ्यांना समाजाच्या आंदोलन बंदोबस्तापासून दूर ठेवले जात नाही ना, असा शंकेचा सूरही पोलीस वर्तुळातून ऐकायला मिळतो आहे.

Web Title: Watch of the Director General of Maratha Police in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस