फौजदाराच्या मारेकऱ्याचाच पोलिसांवर ‘वॉच’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 09:55 PM2018-11-29T21:55:26+5:302018-11-29T21:56:40+5:30
मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपी अद्याप सापडलेला नाही. तो जंगलातच असावा, असा दाट संशय असल्याने सुमारे २०० पोलीस त्याच्या शोधार्थ जंगलात विखुरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपी अद्याप सापडलेला नाही. तो जंगलातच असावा, असा दाट संशय असल्याने सुमारे २०० पोलीस त्याच्या शोधार्थ जंगलात विखुरले आहेत. परंतु हा आरोपीच आता पोलिसांवर ‘वॉच’ ठेऊन स्वत: जंगलात सुरक्षित आश्रय घेत असल्याची बाब समोर आली.
मारेगाव ठाण्यातील पोलीस पथकावर २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री हिवरी या गावी आरोपीने हल्ला चढविला. यात राजेंद्र कुडमेथे या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला तर अन्य दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. या हल्ल्यासाठी आरोपी अनिल मेश्राम (३५) रा.हिवरी याला त्याच्या आईने मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अनिल अनेक महिन्यांपासून फरार असल्याने व त्याचा वॉरंट असल्याने पोलीस अटकेसाठी गेले होते. मात्र त्यांना आरोपीच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले. या घटनेनंतर आरोपी अनिल त्याच रात्री पसार झाला. पोलिसांनी लगेच सर्वत्र नाकेबंदी केली. हिवरी परिसरात घनदाट जंगल, डोंगर-कपाऱ्या, तलाव आहेत. गुराखी असलेल्या अनिलला संपूर्ण जंगलाचा अभ्यास आहे. त्यामुळे तो पाच दिवसांपासून जंगलातच लपून असावा, असा संशय पोलिसांना आहे. म्हणून सुमारे २०० पोलिसांची फौज अनिलच्या शोधार्थ जंगल पालथे घालते आहे.
अनिलचे रोहपट जंगलात लोकेशन
बुधवारी दुपारी २ वाजता अनिलचे लोकेशन याच जंगलातील रोहपट भागात दिसल्याचे सांगितले जाते. त्यावरून अनिल हा रोहपट, सगनापूर, म्हैसदोडका या परिसरातील जंगलातच आश्रयाला असावा, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. २०० पोलिसांनी परिसराला वेढा घातला असल्याने अनिलला जंगलाबाहेर पडण्याची सोय नाही. त्यामुळे तो जंगलातच पोलिसांपासून बचाव करीत आहे.
आता तोच पोलिसांवर ‘वॉच’ ठेवत असल्याची माहिती आहे. जंगलात त्याला पोलीस दिसताच तो स्वत:च सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत असल्याचे सांगितले जाते. हल्ल्यात साथ देणाºया त्याच्या आईला मारेगाव पोलिसांनी लगेच अटक केली होती.
जंगलात फिरताना पोलिसांची होतेय दमछाक
गुराखी अनिलला जंगलात मिळेल ते खाण्याची व कुठलेही पाणी पिण्याची, तासन्तास पाण्याशिवाय राहण्याची सवय आहे. मात्र त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांची चांगलीच दमछाक होते आहे. अनिलचे कुठलेही क्राईम रेकॉर्ड नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
विक्षिप्त अनिलने वडिलांवरही केला होता हल्ला
दारू पिणारे, शिवीगाळ करणारे, मोठ्या आवाजात बोलणारे यांचा त्याला प्रचंड राग होता. याच कारणावरून त्याने एकदा आपल्या पित्यालाही मारहाण केल्याची माहिती आहे. विक्षिप्त असल्यानेच गावकरी त्याच्यापासून चार हात दूर राहात होते, असे सांगितले जाते.