वणी शहरावरील जलसंकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:14 PM2018-06-02T22:14:07+5:302018-06-02T22:14:07+5:30

येथील नगरपरिषदेने आरक्षित केलेला नवरगाव धरणातील जलसाठा संपला असून त्यामुळे वणी शहरावरील जलसंकट अधिक गडद झाले आहे. आरक्षित पाण्यापैकी उरलेले शेवटचे ०.२६ दलघमी शुक्रवारी नवरगाव धरणातून सोडण्यात आले असून हे पाणी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत निर्गुडा नदीत पोहचणार आहे.

The water conservancy of the banyan city is dark | वणी शहरावरील जलसंकट गडद

वणी शहरावरील जलसंकट गडद

Next
ठळक मुद्देकोटा संपला : नवरगाव धरणात केवळ १२ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील नगरपरिषदेने आरक्षित केलेला नवरगाव धरणातील जलसाठा संपला असून त्यामुळे वणी शहरावरील जलसंकट अधिक गडद झाले आहे. आरक्षित पाण्यापैकी उरलेले शेवटचे ०.२६ दलघमी शुक्रवारी नवरगाव धरणातून सोडण्यात आले असून हे पाणी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत निर्गुडा नदीत पोहचणार आहे. त्यानंतर मंगळवारपासून त्या पाण्याचे नळाद्वारे वितरण केले जाणार आहे.
सध्या वणी शहरात नगरपरिषदेद्वारे शहरातील विविध प्रभागात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची भिस्त केवळ टँकरच्या पाण्यावर आहे. रात्रंदिवस हा पाणी पुरवठा केला जात आहे. रात्रीच्यावेळी नागरिक भांडी घेऊन टँकरची वाट पाहत असतात. हवामान खात्याचा अंदाज चुकला आणि पाऊस लांबणीवर गेला तर वणी शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीत पाणी नसल्याने गेल्या १० दिवसांपासून न्वणी शहरात नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता नवरगाव धरणातून शेवटचे आरक्षित पाणी सोडण्यात आले आहे. ते सोमवारी रात्रीपर्यंत वणीपर्यंत पोहचेल. त्यानंतर नळयोजनेद्वारे त्याचे वितरण केले जाईल. आजच्या घडीला नवरगाव धरणात ११.९५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. वणी शहराची तहान भागविणारी निर्गुडा नदी कोरडी पडली आहे. शहराची परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी वणीसाठी २६ डिसेंबर ते १० जून या काळासाठी २.६२ दलघमी पाणी आरक्षित केले होते. १२ टप्प्यात हे पाणी देण्याच्या सूचनाही त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या.
नवरगाव धरणात शिल्लक साठ्यापैैकी १.७५ दलघमी पाणीसाठा मारेगाव शहरासाठी राखीव आहे, तर जिल्हापरिषदेतर्फे ग्रामपंचायती १.५७ दलघमी पाणीसाठा आरक्षित आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रयत्न केल्यास हे आरक्षित पाणीदेखील वणी शहरासाठी मिळण्याची शक्यता आहे. एकूणच वणी शहरातील पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले असून लवकर पाऊस न आल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
वितरण व्यवस्थेत नियोजन नाही
नवरगाव धरणातून पाणी सोडल्यानंतर ते निर्गुडा नदीत १० ते १२ दिवस साठून रहायचे. मात्र पाणी वितरणाचे कंत्राट नव्याने एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कंत्राटदाराकडून वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील काही भागात धो-धो पाणी तर काही भागात पाणीच पोहचत नाही. नदीतील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढल्याने नदीत पाणीच टिकून राहत नाही.
राजकीय पक्षांच्या टँकरसेवेने दिलासा
वणी शहरातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता, वणी नगरपालिकेने शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. मात्र आवश्यक तेवढे पाणी मिळत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी मारामार सुरू होती. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. रात्रंदिवस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यासोबतच राष्ट्रवादी महिला आघाडी, शिवसेना आदींनी देखील टँकरसेवा सुरू केली आहे. त्यामुळे वणीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: The water conservancy of the banyan city is dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.