वीज तोडल्याने जलसंकट गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:25 PM2018-02-27T23:25:22+5:302018-02-27T23:25:22+5:30
थकीत बिलासाठी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडल्याने मांगलादेवी आणि वटफळीत पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.
ऑनलाईन लोकमत
मांगलादेवी/वटफळी : थकीत बिलासाठी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडल्याने मांगलादेवी आणि वटफळीत पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. आधीच पाणीटंचाई, त्यात हा नवीन प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मांगलादेवी ग्रामपंचायतीकडे विद्युत कंपनीचे १३ लाख रुपये थकीत आहे. टंचाईच्या काळात वीज पुरवठा खंडित करू नका, अशी विनंती ग्रामपंचायतीने विद्युत कंपनीकडे केली. मात्र ७५ टक्के रकमेचा भरणा केल्याशिवाय वीज पुरवठा सुरू केला जाणार नाही, अशी भूमिका विद्युत कंपनीने घेतली आहे. सर्वाधिक फटका मजूर वर्ग आणि गरिबांना बसत आहे. काही लोकांनी शेत शिवारातून विविध साधनांद्वारे पाणी आणून गरज भागविणे सुरू केले आहे. मात्र गरिबांकडे पाणी साठविण्याची किंवा आणण्याची कुठलीही सोय नाही. या गावातील लोकांकडे पाणी करापोटी लाखो रुपये थकीत असल्याचे सांगितले जाते. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. दिवसभर जंगलात चरून पाण्यासाठी गावातील हळ्यावर धावत जाणाºया जनावरांना पाण्याचा घोटही मिळत नाही.
पाणीटंचाईमुळे हागणदारीमुक्त गाव योजनेचाही बोजवारा उडाला आहे. पिण्यासाठीच नाही, तर शौचालयासाठी पाणी कोठून आणायचे म्हणून ग्रामस्थांनी शौचालयाकडे पाठ फिरवित उघड्यावर जाणे सुरू केले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा फज्जा उडताना दिसत आहे. पाणी समस्येवर तत्काळ उपाय करावा, अशी मागणी आहे.
वटफळीवासीयांची पायपीट
वटफळी : नेर तालुक्यात येत असलेल्या वटफळी येथील पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्यात आली आहे. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायतीचे पाणी करापोटी दहा लाख रुपये थकीत आहे. वारंवार आवाहन करूनही लोकांनी रकमेचा भरणा केला नाही. परिणामी पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलाचे सात ते आठ लाख रुपये थकीत राहिले. त्यामुळेच वीज तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना या प्रश्नामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. आधीच या गावातील जलस्रोतांची पातळी खोल गेली आहे. आणखी आठ दिवस हिच परिस्थिती राहिल्यास पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
सोनखास परिसरातील १७ गावे संकटात
सोनखास : नेर तालुक्याच्या सोनखास परिसरातील १७ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार सुरु आहे. पाणी पुरवठा योजनांची वीज तोडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हातपंप, विहिरी कोरड्या पडल्या असल्याने गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या स्रोतावरून पाणी आणावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून या भागातील नागरिक पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे. अशातच विद्युत कंपनीने थकीत बिलासाठी नळयोजनेची वीज तोडली. ग्रामपंचायतींकडे मोठी रक्कम थकीत आहे. वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतीने रकमेचा भरणा केला नाही. विहिरी कोरड्या पडल्या, हातपंप बंद आहे. या स्थितीत नळाचे पाणी मोठा आधार होते. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकडे एक ते दोन वर्षांचे पाण्याचे बील थकीत आहे. वसूली न झाल्याने विजेचे बील भरणे शक्य झाले नाही, असे ग्रामपंचायतींकडून सांगितले जाते. यावर तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी आहे.