पुसद तालुक्यात नऊ टँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 05:00 AM2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:16+5:30
गेल्या तीन - चार वर्षांपासून पावसात अनियमितता आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला विलंबाने पाऊस आला. त्यानंतर शेवटच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सरासरीपर्यंत पाऊस झाला. यावर्षी शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस धरणात मे महिन्यात ३० टक्के जलसाठा होता. मात्र पालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने शहराला नियमित पाणीपुरवठा केला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहराचा पारा ४६ अंशावर पोहोचल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मात्र यंदाचा उन्हाळा सुसह्य ठरला असून यावर्षी केवळ ग्रामीण भागात नऊ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान तालुक्यात १३ टँकर सुरू होते.
गेल्या तीन - चार वर्षांपासून पावसात अनियमितता आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला विलंबाने पाऊस आला. त्यानंतर शेवटच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सरासरीपर्यंत पाऊस झाला. यावर्षी शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस धरणात मे महिन्यात ३० टक्के जलसाठा होता. मात्र पालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने शहराला नियमित पाणीपुरवठा केला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही. तथापि माळपठार परिसरातील फेट्रा पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने परिसरात नऊ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
यंदा कोरोनामुळे अनेक नागरिक परराज्य व परजिल्ह्यातून तालुक्यात परत आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही पाण्याचा वापर वाढला. त्यातच वारंवार हात धुण्यास सांगितले जात आहे.
अशा परिस्थितीतही तालुक्यात यावर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवली नाही. तालुक्यातील छोटे, मध्यम प्रकल्प व पाझर तलावात जेमतेम पाणीसाठा होता. तरीही यंदा दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही.
शहरातील बोअरही आटले नाही
यावर्षी शहरातील बोअरसुद्धा आटले नाही. शहरातील विहिरी व बोअरवेलला काही प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शहरात अडचण निर्माण झाली नाही. पारा ४६ अंशावर पोहोचला असतानाही पाणी पातळीत मोठी घट झाली नाही. नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडू दिले नाही. परिणामी पुसदकरांना यंदा पाणी टंचाईची झळ पोहोचली नाही.