ढाणकी येथे पाणी समस्या गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:40 AM2021-05-16T04:40:28+5:302021-05-16T04:40:28+5:30
उन्हाळा सुरू झाला की शहराला पाणीटंचाईची समस्या जाणवते. गेल्यावर्षीपासून नगरपंचायत झाल्याने ही समस्या काही प्रमाणात मिटली. परंतु, फुलसावंगी फाटा ...
उन्हाळा सुरू झाला की शहराला पाणीटंचाईची समस्या जाणवते. गेल्यावर्षीपासून नगरपंचायत झाल्याने ही समस्या काही प्रमाणात मिटली. परंतु, फुलसावंगी फाटा येथे असलेल्या शिक्षक कॉलनीला फायदा झाला नाही. तब्बल २० वर्षांपासून येथील नागरिकांना नळाचे व्यवस्थित पाणी मिळत नाही. या संदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायत व नंतर नगरपंचायतीला विनंती अर्ज दिले. मात्र, समस्या सुटली नाही.
आता उन्हाळ्यात बोअरवेलसुद्धा कोरडे पडल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसचे शहर अध्यक्ष अमोल तुपेकर यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित नागरिकांना भेटून समस्या जाणून घेतली. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. पाईपलाईनचे काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा तुपेकर यांनी दिला आहे. निवेदन देताना उपनगराध्यक्ष जहीर भाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव पाटील चंद्रे, शिवसेना शहर प्रमुख बंटी जाधव, पाणीपुरवठा सभापती संबोधी गायकवाड, ओमा पाटील चंद्रे आदी उपस्थित होते.