राळेगावात पाण्याचे वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 06:00 AM2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:08+5:30

सुमारे २० हजार लोकसंख्येच्या शहराला आज हिवाळ्यातच ४०-४० दिवस पाणीपुरवठा होऊ शकत नाही. उन्हाळ्यात तर या शहरातील नागरिकांना शहर सोडण्याची वेळ तर येणार नाही, अशी साधार भीती व्यक्त होऊ लागली आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. यात इतक्या प्रदीर्घ कालावधीकरिता झालेली हयगय गंभीर बाब आहे.

Water rains in Ralegaon | राळेगावात पाण्याचे वांदे

राळेगावात पाण्याचे वांदे

Next
ठळक मुद्देदिवाळीतही नागरिकांची भटकंती : नगर पंचायतच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : तालुका व उपविभागाचे मुख्यालय असलेल्या राळेगाव शहरात पिण्याच्या पाण्याचे वांदे सुरू आहे. नळ योजनेचा पाणीपुरवठा तब्बल ४० दिवसाने झाला. विधानसभेची निवडणूक आणि दिवाळीतही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. यावरून नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुमारे २० हजार लोकसंख्येच्या शहराला आज हिवाळ्यातच ४०-४० दिवस पाणीपुरवठा होऊ शकत नाही. उन्हाळ्यात तर या शहरातील नागरिकांना शहर सोडण्याची वेळ तर येणार नाही, अशी साधार भीती व्यक्त होऊ लागली आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. यात इतक्या प्रदीर्घ कालावधीकरिता झालेली हयगय गंभीर बाब आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यातील कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
आठ कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू होऊन पुरते दोन वर्षही झाले नाही, तरी या नळ योजनेचा परिपूर्ण उपयोग शहरवासीयांना झालेला नाही. ५५ लाखांचे फिल्टर प्लांट पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आले. मागीलवर्षी १२ लाख रुपये पुन्हा त्यावर खर्च करण्यात आले. तरी राळेगावकरांना नियमित शुद्ध पाणी मिळत नाही. गत एक वर्षापासून पाणीपुरवठा होणारी पाईपलाईन सिमेंट रोडखाली दबल्याने एक पाण्याची टाकी निरूपयोगी झाली आहे. प्रभाग क्र.१४, १५, १६, १७ आदी भागांमध्ये चार-पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा कायमचा बंद आहे.
कळमनेर येथील पाण्याच्या टाकीवर लावलेल्या ४० हॉर्सपॉवरच्या दोन मोटारी दोनदा क्रमाक्रमाने जळाल्या. आठ-आठ दिवस दुरुस्तीकरिता व त्यानंतर खोलफिटिंगकरिता वेळ लागला. वीज विभागाद्वारे पुरेशा प्रमाणात आवश्यक दाबाने वीजपुरवठा न झाल्याने मोटारी जळाल्या. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला, असे नगरपंचायतीद्वारे सांगून वेळ मारून नेण्यात आली. मागील दोन वर्षांपासून शहरात सरासरी आठ-दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. दुसरीकडे पाणीपट्टी मात्र पूर्ण बाराही महिन्याची सक्तीने वसूल करण्यात येत आहे. नागरिकांना पूर्ण पाणीपट्टी भरल्यानंतरही पाण्याकरिता भटकंती करावी लागते. पाण्याचे जार, टँकरद्वारे पाणी बोलवावे लागते. बोअरिंग विहिरीवरील पाण्यासाठी अतिरिक्त वीज खर्च सोसावा लागतो.

रोगराईत वाढ
खोल हातपंप, बोअर, विहिरीतून काढलेल्या पाण्याच्या सेवनाने शहरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. फ्लोराईडची मात्रा या पाण्यात अधिक राहात असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. घरोघरी, कार्यालयात जारच्या पाण्याचा वापर वाढला आहे. जारचे अशुद्ध व थंड पाण्याचा वापरही अनेक प्रकारच्या रोगराईस वाढ ठरण्यास कारणीभूत ठरत आहे. पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांची मात्र चांगलीच चांदी झाली आहे.

वीज अभियंत्याचा नगरपंचायतला सल्ला
कळमनेर येथे वीज पुरवठा यवतमाळ ४५ किमी दूरवरच्या लाईनवरून होतो. त्यामुळे वीज पुरवठ्यात व पूर्ण दाबात कधीकधी अडचणी येतात. बरडगाव येथील १३२ केव्ही स्टेशन क्रियान्वित होताच या समस्या कायमच्या दूर होतील. नगरपंचायतीने कळमनेर येथेच आणखी एक ४० हॉर्स पॉवरची मोटार स्पेअरमध्ये ठेवल्यास अशाप्रसंगी वेळ वाचेल, असा सल्ला विद्युत कंपनीचे उपकार्यकारी अभियंता जितेश गजबे यांनी दिला.

नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
पाणीपुरवठ्याच्या कामात हयगय करणाऱ्या संबंधितांवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे, असे नगरपंचायतच्या अध्यक्ष माला खसाळे यांनी सांगितले. कमी-अधिक विजेच्या दाबामुळे मोटारी जळाल्या आहेत. नगरपंचायतचे बहुतांश कर्मचारी निवडणूक ड्यूटीवर होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या कामात दुर्लक्ष झाले, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Water rains in Ralegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.