जलवाहिनीचे पुनरुज्जीवन होणार
By admin | Published: January 20, 2015 12:13 AM2015-01-20T00:13:57+5:302015-01-20T00:13:57+5:30
नळाला पाणी येत नाही, ही यवतमाळ शहरातील नागरिकांची तक्रार काही महिन्यातच थांबणार आहे. शिवाय जेथे अजूनही नळ पोहोचले नाही तेथेही पाईप लाईन टाकली जाणार आहे
११ कोटी : २५ किलोमीटरची पाईप लाईन
यवतमाळ : नळाला पाणी येत नाही, ही यवतमाळ शहरातील नागरिकांची तक्रार काही महिन्यातच थांबणार आहे. शिवाय जेथे अजूनही नळ पोहोचले नाही तेथेही पाईप लाईन टाकली जाणार आहे. यासाठी नगरपरिषदेला चार कोटी ३८ लाख रुपये मिळाले आहे. गेली १० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
नगरपरिषदेने शहराला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी २००७ मध्ये प्रस्ताव पाठविला होता. १० कोटी ९६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. यातील ८० टक्के रक्कम केंद्र शासन तर, १० टक्के रक्कम राज्य शासनाची राहणार होती. १० टक्के लोकवाटा होता. प्रस्तावानुसार चार कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा निधी २०११ मध्ये नगरपरिषदेकडे वळता करण्यात आला. यातील ५५ लाख राज्याचे तर २३ लाख ७६ हजार रुपये लोकवर्गणी होती. यातून २७ किलोमीटर पाईप लाईन टाकण्यात आली. मात्र निधीअभावी काम अर्ध्यावर थांबले होते.आता ‘यूआयडीएसएसएमटी’ (मध्यम शहरासाठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्राम योेजना) पाईप लाईन मंजूर करण्यात आली. चार कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर करून जीवन प्राधिकरणाकडे वळता करण्यात आला. येत्या काही दिवसात वाढीव पाईप लाईनच्या कामाला सुरुवात होणार आहे. (शहर वार्ताहर)