वणी तालुक्यावर पाणी टंचाईचे ढग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 10:37 PM2019-02-22T22:37:37+5:302019-02-22T22:37:57+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे. यावर स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी वरिष्ठ पातळीवर मात्र या उपाययोजनांना ब्रेक लागल्याचे दिसत आहे.
वणी तालुक्यातील नायगाव (खु.) येथे पिण्यासाठी जलस्त्रोत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे या गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा व्हावा, यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु तो अद्यापही तेथे धूळ खात पडून आहे. नायगाव (खु.) ची लोकसंख्या एक हजार १२५ आहे. या गावात पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावकऱ्यांना टँकरची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील पेटूर येथे मागील वर्षापर्यंत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. परंतु गावकºयांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर या गावाला मानकी येथील बोअरवेलवरून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. यावर्षी या गावाची चिंता मिटली आहे. तालुक्यातील गोपालपूर, वरझडी, वरझडी बंडा, वडगाव (टीप), खांदला, कुर्ली या गावांमध्ये बोअर अधिग्रहण करून गावकºयांना पाणी पुरविले जात आहे.
संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ उमरी येथे बोअर अधिग्रहणाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांनी मंजूर केला असला तरी अद्याप अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. निंबाळा (बु.) या गावाला पाणी पुरवठा करणाºया बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव आराखड्यात मंजूर करण्यात आला. परंतु आराखडा अद्यापही अप्राप्त आहे. वणी तालुक्यातील सावंगी या गावातही पाणी पेटले आहे. या गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा प्रस्तावित आहे. पिंपरी (कायर), तेजापूर येथेही तिच परिस्थिती आहे.
पाण्याअभावी जनावरांचेही होणार हाल
जंगलातील तलाव, नाले व अन्य जलस्त्रोत आतापासूनच कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी आतापासूनच जनावरांचे हाल सुरू झाले आहे. वणी, मारेगाव व झरी या तीन तालुक्यात घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यजिवांची संख्याही मोठी आहे. मात्र पाण्याअभावी या वन्यजिवांचेही हाल होणार आहे. पाळीव जनावरे चरण्यासाठी जंगलात जातात. परंतु त्यांना त्याठिकाणी पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र परिसरातील जंगलांमध्ये पाहावयाला मिळत आहे. यंदा माणसांसोबत जनावरांचेदेखिल पाण्यासाठी हाल होणार आहेत.