घाटंजी शहराची भिस्त वाघाडी धरणावर; ५० टक्के पाणी शिल्लक पण वापर जपूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2022 04:26 PM2022-05-03T16:26:37+5:302022-05-03T16:37:05+5:30

घाटंजी तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीप्रश्न आहे. विविध उपाययोजना करून यावरही मात करण्याचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

water scarcity in ghatanji tehsil; but 50 percent water decreased in waghadi dam | घाटंजी शहराची भिस्त वाघाडी धरणावर; ५० टक्के पाणी शिल्लक पण वापर जपूनच

घाटंजी शहराची भिस्त वाघाडी धरणावर; ५० टक्के पाणी शिल्लक पण वापर जपूनच

googlenewsNext

विठ्ठल कांबळे

घाटंजी (यवतमाळ) : सूर्य आग ओकतो आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. याचा जलसाठ्यावरही परिणाम झाला आहे; मात्र पावसाळ्यात भरपूर पाणी झाल्याने गतवर्षीपेक्षा यावेळी पाणीटंचाईची तीव्रता थोडीफार कमी आहे.

घाटंजी शहराला वाघाडी मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. या प्रकल्पाची साठवण क्षमता ३५.३६ दलघमी आहे. सद्यस्थितीत १७.७४ दलघमी म्हणजे ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. घाटंजी शहरासाठी दोन एमएमक्यु दशलक्षघनमीटर पाणी आरक्षित आहे. घाटंजी तहसील ग्रामीणसाठी ४.५० दशलक्ष घनमीटर, यवतमाळ तहसील ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी दोन एमएमक्यु दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे, तसेच १८किलोमीटरपर्यंत शेतीसाठी पाणी पुरवठा होतो. आतापर्यंत दोन रोटेशन झाले असून, तिसरे रोटेशन शेतीसाठी ४ मे पासून आहे.

वाघाडी धरणातून शहराला जलशुधद्धीकरण केंद्रामार्फत दररोज १७ लाख लीटर पाणी पुरवठा होतो. शहरात २३० हातपंप, २५ विंधन विहिरी, सात सार्वजनिक विहिरीमधून पाणीपुरवठा होतो. तसेच काही भागात एका टँकरव्दारे सार्वजनिक विहिरीत पाणी घेतले जाते. काही भागात दररोज दोन वेळा तर काही भागात एक दिवस आड दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. शहरात २३०० नळ कनेक्शन आहेत. पाणीपट्टी थकबाकी ५१लाख रुपयांपैकी २७ लाख रुपये वसुली करण्यात आली.

नामापूर गावाला होतोय टँकरने पाणीपुरवठा

ग्रामीण भागात नामापूर येथे टँकरव्दारा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वासरी, देवधरी, येडशी, कोळी बु., सोनखास, विरुळ,कवठा, येडशी, कोळी खु.,ससानी,मांडवा,वाढोणा या १२ गावांसाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यावर होणाऱ्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठ्यात अडचणी

घाटंजी शहरात पाण्याचे अनेक स्रोत आहे. विहिरी, हातपंपाला भरपूर पाणी आहे. त्यामुळे सद्यातरी पाण्याची समस्या नाही. मात्र, इतर काही ठिकाणचा अनुभव पाहता वीज पुरवठा नियमित न राहिल्यास योजनेच्या पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण शक्यता नाकारता येत नाही. गर्मी वाढल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. अशावेळी पाण्याची अडचण निर्माण होऊ नये याकरिता यंत्रणेने आतापासूनच उपाययोजना करण्यात याव्या, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

घाटंजी तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीप्रश्न आहे. विविध उपाययोजना करून यावरही मात करण्याचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न आहे. नदी, नाले आटले असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. ही जनावरे घरी आल्यानंतर त्यांना पिण्यासाठी पाणी साठवून ठेवावे लागते.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याची ओरड आहे. वारंवार वीज गूल होते. काही ठिकाणी अर्धा तास, तर काही ठिकाणी तासनतास वीज बंद राहते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरण्यात अडचणी निर्माण होतात. अशावेळी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. यासाठी काही ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावाही केला जाणार आहे. विद्युत कंपनीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

जलजीवन मिशनमधून अधिकाअधिक कामे घेणार

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असून भारनियमनामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. परंतु, काही दिवसातच लोडशेडिंगची समस्या सुटेल व पाणी पुरवठा नियमित सुरू होईल. प्रकल्पात पाणी भरपूर असले तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

अमोल माळकर, मुख्याधिकारी नगर परिषद, घाटंजी

गतवर्षीपेक्षा यावर्षी प्रस्ताव कमी आले आहेत. या मे महिन्यात कदाचित ते वाढतील. पाणी टंचाई कृती आराखडा व जलजीवन मिशन कृती आराखड्यातून जास्तीत जास्त कामे करून तालुक्यात पाणी टंचाई भासणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहे

सोनाली माडकर, गटविकास अधिकारी, घाटंजी

Web Title: water scarcity in ghatanji tehsil; but 50 percent water decreased in waghadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.