लोहारा परिसराला पाणीटंचाईचा विळखा

By admin | Published: May 20, 2017 02:33 AM2017-05-20T02:33:12+5:302017-05-20T02:33:12+5:30

शहरातील सर्वात झपाट्याने वाढणारा परिसर म्हणजे लोहारा भाग होय. पूर्वी लोहारा ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती,

Water scarcity in Lohara area | लोहारा परिसराला पाणीटंचाईचा विळखा

लोहारा परिसराला पाणीटंचाईचा विळखा

Next

केवळ एक टँकर सुरू : बोअरवेल व विहिरींनीही गाठला तळ, प्राधिकरणाचे नळही नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील सर्वात झपाट्याने वाढणारा परिसर म्हणजे लोहारा भाग होय. पूर्वी लोहारा ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती, परंतु आता हा भाग सुद्धा यवतमाळ नगर परिषदेत विलिन झाला आहे. मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असलेल्या या भागात दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. परंतु आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाही. पूर्वी ग्रामपंचायत असताना काही तरी सुविधा केल्या जात होत्या. परंतु आता नगर परिषदेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप या भागातील नागरिकांचा आहे.
सध्या मे महिन्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. प्रकल्पातील पाण्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नळांनाही पाणी नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आठवड्यातून दोनवेळ नळ सोडले जातात. परंतु कमी दाबाने येणाऱ्या नळामुळे नागरिकांचे चांगलेच हाल आहे. अनेक भागात नळाचे पाणी पोहचत नाही. मागील वर्षी लोहारा परिसरातील पाणीटंचाईग्रस्त भागात सात ते आठ टँकर नियमितपणे सुरू होते. यावर्षी नगर परिषदेचे केवळ एक टँकर सुरू केले असून समाजसेवी अनिल यादव यांनी नागरिकांसाठी स्वत: एक टँकर सुरू केले आहे. या दोन टँकरच्या भरोशावर मोठ्या भागात असलेल्या पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविणे शक्य होताना दिसत नाही.
शिवाजी नगर झोपडपट्टी, रेणुका नगर, देवी वॉर्ड, साने गुरुजी कॉलनी, मैथीली नगर, बोदड, प्रिया रेसिडन्सी, साठवणे ले-आऊट आदी भागात तीव्र पाणीटंचाई आहे. यातील बहुतांश भागात तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना बोअरवेल व विहिरींवरच अवलंबून रहावे लागते. परंतु उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये बोअरवेल, विहिरी आणि हातपंपांनीही तळ गाठला आहे. अनेकजण खासगी टँकर विकत घेत आहेत. परंतु पाचशे ते सातशे रुपयांचे टँकर घेणे प्रत्येकालाच परवडणारे नसते. तसेच पाण्याची साठवण करण्याचे साधनेही घरात नसतात. त्यामुळे गटागटाने नागरिक टँकर विकत घेतात. तीन ते चार घरांमिळून टँकर घेऊन सर्व मिळून पैसे देतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाण्याचे बिल भरल्यानंतरही अशाप्रकारे पुन्हा आर्थिक भूदंड सर्वसामान्य व गोरगरिब नागरिकांना सहन करावा लागत आहे.
शिवाजी नगर, पांढरी परिसरातील हातपंपही आटल्याने येथील नागरिकांची चांगलीच कसरत सुरू आहे. या परिसरात गोरगरीब व हातमजुरी करणारे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या नागरिकांना विकतचे पाणी घणे परवडणारे नाही. लोहारा वळणमार्गावर पाण्याची नवीन टाकी झाली आहे. या टाकीवरून काही नागरिकांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. सध्या तरी या टाकीचा लोहारा परिसरातील नागरिकांना आवश्यक तो फायदा होताना दिसत नाही. नगर परिषदेने या भागात पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरच्या फेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी आहे.

पाणीसमस्या कायमस्वरुपी सुटावी
लोहारा परिसरातील पाणीसमस्या ही दरवर्षीचीच आहे. परंतु याकडे गांभिर्याने कुणीच लक्ष देण्यास तयार नाही. नगर परिषदेकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु नगर परिषदेनेही भ्रमनिरास केल्याचे नागरिक सांगतात. नवीन टाकी झाली, परंतु या टाकीचाही फायदा अद्याप दिसून येत नाही. काही ठराविक भागातील नागरिकांना या टाकीवरून नळजोडण्या दिल्या आहेत. या भागातील सरसकट नळजोडण्या याच टाकीवरून जोडण्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यापूर्वी ते शक्य होताना दिसत नाही. लोहारा परिसर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या प्रमाणात पाण्याची सोय होताना दिसत नाही. नगर परिषद ज्या प्रमाणात करवसुली आणि त्यासाठी मोजणी व नोंदणीवर जोर देत आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर मात्र कोणताही जोर देत नाही. त्यामुळे नागरिकांध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे.
 

Web Title: Water scarcity in Lohara area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.